बंगालच्या उपसागरात ‘असानी’ चक्रीवादळ तयार

बंगालच्या समुद्रात रविवारी सकाळी असानी चक्रीवादळ तयार झाल्याची घोषणा भारतीय वेधशाळेने दिली. या वादळाची दोन दिवसांपूर्वीच पूर्वकल्पना भारतीय वेधशाळेने दिली होती. सोमवारपर्यंत असानी या वादळाचे तीव्र चक्रीवादळात रुपांतर होईल. १० मे रोजी मंगळवारी आंध्र प्रदेश राज्याच्या उत्तरेकडील भाग आणि नजीकच्या ओडिशा किनारपट्टीला भारतीय वेधशाळेने रेड अलर्ट जाहीर केला आहे. कोकणात मंगळावारपासून तीन दिवस तर मध्य महाराष्ट्रात बुधवारपासून दोन दिवस पूर्व मोसमी पाऊस राहील, असा अंदाज भारतीय वेधशाळेने दिला आहे.

(हेही वाचा – मुंबईतील ‘हा’ उड्डाणपूल १२ दिवस वाहतुकीसाठी पूर्णत: बंद!)

पावसाच्या आगमानापूर्वीचे बंगालच्या उपसागरातील पहिले चक्रीवादळ

असानी हे यंदाच्या वर्षातील पावसाच्या आगमानाअगोदर बंगालच्या उपसागरात तयार झालेले पहिले चक्रीवादळ आहे. मे आणि जून हे दोन्ही महिने चक्रीवादळाचे समजले जातात. भारतीय उपखंडात बंगालच्या उपसागरात चक्रीवादळांची निर्मिती जास्त होते. अंदमानच्या समुद्रात मे महिन्याच्या सुरुवातीलाच कमी दाबाच्या निर्मितीची कल्पना भारतीय वेधशाळेला होती. तीन दिवसांपूर्वीच या कमी दाबाची तीव्रता वाढत असल्याचे भारतीय वेधशाळेने जाहीर केले होते. रविवारी सकाळी तयार झालेल्या असानी चक्रीवादळ सध्या ८० ते ९० ताशी किलोमीटर वेगाने समुद्रात वाहत आहे. सायंकाळी १०० ते ११० ताशी किलोमीटर वेगाने वारे वाहतील. सोमवारी सकाळी ११५ ते १२५ ताशी वेगाने वारे वाहतील, असा इशाराही देण्यात आला आहे.

राज्यासाठीचा अंदाज

० असानी या वादळाच्या निर्मितीमुळे राज्यातील मच्छिमारांना कोणताही इशारा दिलेला नाही. आंध्रप्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगाल राज्यातील मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
० विदर्भात ११ मे पर्यंत उष्णतेची लाट राहील.
० राज्यात कोकणात मंगळवार ते गुरुवार आणि मध्य महाराष्ट्रात बुधवार आणि गुरुवार पूर्वमोसमी पाऊस राहील.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here