‘असानी’चे तीव्र चक्रीवादळात रुपांतर

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या असानी या चक्रीवादळाचे रविवारी सायंकाळी तीव्र चक्रीवादळात रुपांतर झाले. रविवारी सायंकाळी असानी हे तीव्र चक्रीवादळ निकोबार बेटापासून ६१० किलोमीटर अंतरावर होते. आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम किनारपट्टीपासून ८१० किलोमीटर अंतरावर तर ओडिशा किनारपट्टीपासून ८८० किलोमीटर अंतरावर असानी चक्रीवादळ होते. मात्र १० मे रोजी असानी तीव्र चक्रीवादळ रात्रीच्यावेळी आंध्रप्रदेश किनारपट्टीवरील उत्तरेकडील भागांत आणि नजीकच्या ओडिशा किनारपट्टीवर येईल, असा इशारा भारतीय वेधशाळेने दिला आहे.

‘असानी’ जमिनीवर धडकणार का?

असानी तीव्र चक्रीवादळ नेमके कुठे धडकेल?  याबाबत भारतीय वेधशाळेने अद्याप घोषणा केलेली नाही. मात्र १० मे नंतर असानी तीव्र चक्रीवादळ ओडिशा किनारपट्टीपासून पुन्हा बंगालच्या उपसागरात जाईल, असा अंदाजही भारतीय वेधशाळेने व्यक्त केला आहे. त्यामुळे असानी तीव्र चक्रीवादळ जमिनीवर धडकणार का? याबाबत भारतीय वेधशाळेने वेट एण्ड वॉच अशी भूमिका घेतली आहे.

( हेही वाचा: … म्हणून बंगालच्या उपसागरातील वादळाला पडलं ‘असानी’ हे नाव! )

भारतीय हवामान खात्याचे आवाहन

कदाचित असानी आंध्र प्रदेशच्या उत्तर भागाजवळ रात्री आल्यानंतर तिथूनच पाठी परतेल, असाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, समुद्रात ११५ ताशी वेगाने वारे वाहत आहेत. सोमवारी सकाळी समुद्रातील वारे १२५ ताशी वेगाने वाहतील, असा इशाराही भारतीय वेधशाळेने दिला आहे. आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील मच्छिमारांनी तातडीने मासेमारी बंद करून किना-यावर परतावे, असे आवाहन भारतीय हवामान खात्याने केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here