टाटा समूहाचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं रविवारी निधन झालं. रस्ते अपघातात त्यांना त्यांचा जीव गमवावा लागला. मिळालेल्या माहितीनुसार, सायरस मिस्त्री यांच्या गाडीचा अपघात मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चारोटी येथे झाला. या राष्ट्रीय महामार्गावर वारंवार अपघात होत असून हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. महाराष्ट्र बॉर्डरवरील अछाड ते घोडबंदर अशा ११८ किलोमीटरच्या पट्ट्यात २९ ब्लॅक स्पॉट असून तेथे नेहमीच अपघात होतात.
(हेही वाचा – Cyrus Mistry Death : टाटा समूहाच्या सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू)
समोर आलेल्या माहितीनुसार, २०१४-१५ मध्ये याच ब्लॅक स्पॉटची संख्या साधारण ८२ होती, त्यानंतर ती कमी होऊन २९ वर आली. मात्र असे असले तरी अद्याप अपघातांमध्ये कोणतीही घट दिसून येत नाही. यामुळे या ठिकाणी वर्षभरात साधारण चारशेच्या जवळपास बळी गेल्याची माहिती काही जाणकार मंडळींनी दिली आहे. ज्या ठिकाणी सायरस मिस्त्रींच्या कारचा अपघात झाला तो सुद्धा ब्लॅक स्पॉट असून चारोटीचा उड्डाणपूल उतरताच वाहन वेगाने धावताना दिसतात. हा पूल उतरताना तीन लेन आहेत. त्या तीन लेनचं अचानक दोन लेनमध्ये रूपांतर होतं. आणि यावेळी वाहन चालकांचा गोंधळ उडतो. या पुलाला थेट सूर्य नदीच्या पुलाचा कठडा जोडलेला आहे. तो कठडा बाहेर निघाल्याने त्याला देखील वाहनांची धडक बसते. याठिकाणीच हा अपघात झाला.
पालघरच्या चारोटी परिसरात त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. मुंबई-अहमदाबाद मार्गावर सूर्या नदीवरील पुलावर सायरस मिस्त्री यांची मर्सिडीज कार दुभाजकाला धडकली. या अपघातामध्ये मिस्त्री यांच्या गाडीचा चालक गंभीर जखमी झाला आहे. तर सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला. चालकाचे गाडीवर नियंत्रण न राहिल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास हा अपघात घडला. रुग्णालयात नेण्यापूर्वीच सायरस मिस्त्री यांचे निधन झाले होते.
Join Our WhatsApp Community