Dadar : दादर हल्ला प्रकरण : पाय तोडण्यासाठी दिली पाच लाखांची सुपारी; चार हल्लेखोरांना अटक

राजेश हातनकर, नूर सय्यद, साकीब कुरेशी आणि यादव असे अटक करण्यात आलेल्या हल्लेखोरांची नावे आहेत.

314

वंचित बहुजन आघाडीचे मुंबई जिल्हाध्यक्ष परमेश्वर रणसूर आणि वॉर्ड अध्यक्ष गौतम हराळ या दोन पदाधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी चार हल्लेखोरांना अटक केली आहे. या हल्ल्यात पनवेल येथील माजी उपमहापौर आणि त्याच्या मुलाचे नाव समोर येत असून या दोघांनी परमेश्वर रणशूर याचे पाय तोडण्यासाठी हल्लेखोरांना पाच लाख रुपयांची सुपारी दिली होती, असे पोलिसांच्या तपासात समोर आले असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

राजेश हातनकर, नूर सय्यद, साकीब कुरेशी आणि यादव असे अटक करण्यात आलेल्या हल्लेखोरांची नावे आहेत. मुंबईतील दादर परिसरात २७ मे रोजी वंचित बहुजन आघाडी पक्षाचे पदाधिकारी परमेश्वर रणसूर आणि गौतम हराळ यांच्यावर चाकू आणि रॉडने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात परमेश्वर आणि गौतम हराळ हे जखमी झाले होते, त्यांना केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध भादंवि कलम ३०७, ३२६ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला होता. जखमी परमेश्वर आणि गौतम हराळ यांनी दिलेल्या जबाबात या हल्ल्यामागे पनवेलचे माजी उपमहापौर यांचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. दरम्यान भोईवाडा पोलिसांना घटनास्थळी मिळून आलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी हल्लेखोरांचा ओळख पटवून मुंबईतून चार जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसानी दिली. या चौघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना ५ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार परमेश्वर आणि हराळ यांच्यावर हल्ला करण्यासाठी पनवेलच्या एका माजी उपमहापौर आणि त्याच्या मुलाने हल्लेखोरांना ५ लाखांची सुपारी दिली होती. या हल्ल्यामागील सूत्रधाराचे नाव समोर आले असून लवकर या दोन्ही सुत्रधाराना अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. अटक करण्यात आलेल्या हल्लेखोरांपैकी दोघे जण सराईत गुंड असून त्याच्यावर मुंबईत गुन्हे दाखल असल्याचे समजते.

(हेही वाचा Aahilyadevi Holkar Nagar : आता अहमदनगरचे नाव ‘अहिल्यादेवी होळकर नगर’ होणार)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.