गणेशोत्सवाची लगबग आता सुरू झाली असून, या सणासाठी लागणाऱ्या सजावटीच्या सामानापासून ते मोदक, लाडवांच्या प्रसादासह अगरबत्ती, धूप आदींच्या वस्तूंनी दादरचा बाजार अगदी फुलून गेला आहे. 5 सप्टेंबर रोजी गणेशोत्सवापूर्वीचा शेवटचा रविवार असल्यानेही बाजारात लोकांची गर्दी खुलून दिसत होती. असे असले तरी प्रत्यक्षात गणेश भक्तांचा खरेदीचा ओघ तसा कमीच असल्याने विक्रेते मात्र चिंतेत आहेत. आधीच कोविडमुळे धंदे बंद होते, मागील गणेशोत्सवात धंदाही लावता आला नव्हता. पण यंदाच्या गणेशोत्सवात धंदा लावला तरी ग्राहकांच्या खरेदीची तेजी दिसत नसल्याने किमान गुंतवलेले चार पैसे तरी सुटू देत, एवढीच याचना प्रत्येक व्यावसायिक गणरायांना करताना दिसत आहेत.
दादरचे बाजार बहरले
कोविडमुळे मागील गणेशोत्सवात घाबरत व्यावसाय करणाऱ्या फेरीवाल्यांनी यंदा गणेशोत्सवासाठी आकर्षक वस्तूंच्या विक्रीचे स्टॉल्स लावले आहेत. दादरसह मालाड, बोरीवली, भांडुप, घाटकोपर, विलेपार्ले, मुलुंड आदींसह प्रमुख भागांत फेरीवाल्यांनी आपल्या व्यवसायाशेजारी गणेशोत्सवासाठी अगरबत्ती धूप, कापडी फुले व त्यांची तोरणे, लाडू, मोदक, फुटाणे, टाळ, निरंजन, समई तसेच सजवाटीसाठी आवश्यक असणारे आकर्षक कपडे, पडदे, विजेचे दिवे, तोरण आदींचे स्टॉल्स लावले आहेत. दादरमधील जावळे मार्गावरील पदपथ या गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या प्रत्येक वस्तूंच्या सामानांच्या स्टॉल्सनी खुलून गेले आहेत. तर डिसिल्व्हा रोड कपडे आणि फळांनी, तर स्टेशनपासून ते रानडे मार्ग आणि छबिलदास गल्ली तर आकर्षक फुलांनी आणि कंठ्या, हार आणि फुलांच्या लडी तसेच मखरांनी बहरुन गेले आहेत.
(हेही वाचाः दादरचे फेरीवाले होणार तिसऱ्या लाटेचे ‘कोरोना स्प्रेडर’!)
फेरीवाले मात्र चिंतेत
यंदा कोविड काळात अनेकांचे रोजगार गेले असून, त्यांच्या खिशाला परवडेल अशा किंमतीत वस्तू या केवळ रस्त्यावरील फेरीवाल्यांकडे उपलब्ध होत असतात. गणेशोत्सव साजरा करायचा असल्याने प्रत्येक जण आपापल्या खिशाला परवडणा-या वस्तूंची खरेदी करत असतो. त्यामुळे गरीबांपासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वांनाच दादरमधील बाजारांची भुरळ पडते. परंतु यंदा कर्ज काढून सामानाची खरेदी करुन स्टॉल्स लावले असले, तरी गिऱ्हाईक त्या प्रमाणात नसल्याने काहीसा चिंतेचा भाव विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.
लोकलमुळे बाजारातील गर्दी आटली
फेरीवाल्यांच्या म्हणण्यानुसार, लोकल बंद असल्याने याचा परिणाम त्यांच्या व्यवसायावर झाला आहे. एरव्ही गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी दादर गाठणारी मंडळी आता लोकल खुल्या नसल्याने बाहेर पडू शकत नाहीत. ती मंडळी आता आपल्याच भागांमधून वस्तूंची खरेदी करत आहेत. त्यामुळे हा परिणाम असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. जावळे मार्गावर गणेश सजवटीसाठी लागणाऱ्या कपड्यांसह दुपट्टा आदींची विक्री करणाऱ्या मनिष कुमार यांच्या मते, पूर्वी गिऱ्हाईकांपुढे फुरसत नसायची, पण आता गिऱ्हाईकांची वाट पाहावी लागते. पण मागील गणेशोत्सवापेक्षा तरी परिस्थिती बरी आहे.
(हेही वाचाः तिस-या लाटेला रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केले ‘हे’ आवाहन)
नुकसानाची टांगती तलवार
याच मार्गावर बुंदी लाडू, मोदक आणि फुटाणे आदींसह डिश, प्लेट, ग्लास, कागदी ड्रोनची विक्री करणाऱ्या चंद्रकांत साळुंखे यांच्या म्हणण्यानुसार, दादरमध्ये गर्दी तशी भरपूर दिसते, पण ती खरेदीची गर्दी नाही. चाकरमानी गावी जाण्यापूर्वी आठ दिवस अगोदर सर्व खरेदी करत असतो. तशी जी खरेदी व्हायला हवी तशीही खरेदी होत नाही. खरेदीसाठी किरकोळच ग्राहक असून लोकल बंद असल्याने याचा परिणाम झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कोविडच्या आजारामुळे कधीही पुन्हा लॉकडाऊन होईल या भीतीने आधीच आम्ही कमी माल भरला आहे. पण जितका माल भरला त्याची मुद्दल तरी निघेल का, अशी भीती आतापर्यंतच्या खरेदीला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे वाटू लागली आहे.
पुरवठ्यापेक्षा मागणी कमी
कापडी फुले आणि फुलांच्या लडीची विक्री करणाऱ्या स्वप्नील साळवी यांनी मागील वर्षी कोविडमुळे धंदा लावला नव्हता, पण यंदा घाबरत स्टॉल लावला आहे. कोविडच्या भीतीने आधीच माल उपलब्ध नाही. त्यातही दरवर्षीच्या तुलनेत २५ टक्के माल खरेदी करत विक्रीला ठेवला आहे. पण त्या तुलनेत गिऱ्हाईक दिसत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.
(हेही वाचाः तिसरी लाट थोपवायची की तिला आमंत्रण द्यायचे… काय म्हणाले मुख्यमंत्री?)
नवीन वस्तू खरेदीसाठी
गणेश मूर्तींसाठी आकर्षक हार तथा कंठ्यांची विक्री करणारे वसंत शेलार यांचा कटलरीचा व्यवसाय आहे. परंतु गणेशोत्सवासाठी ते हार, कंठी विक्रीचा व्यवसाय करत आहेत. यंदा ७० ते २०० रुपयांपर्यंत कंठ्या उपलब्ध आहेत. पण बाजार भरलेला दिसत असला, तरी खरेदी करणारी ही गर्दी नाही. लोकांकडे पैसा नसल्याने ज्या गोष्टी टाळता येण्यासारख्या आहेत व मागील वर्षीच्या वापरात येऊ शकतात, अशा वस्तू ते खरेदी करणे टाळत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गिऱ्हाईक नसल्याने चिंता आहेच, असे त्यांनी स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community