दादर केले साफ… मुजोर फेरीवाल्यांमध्ये ‘नव्या’ अधिकाऱ्याची दहशत

या अधिका-यांच्या धडक कारवाईमुळे अनधिकृत फेरीवाल्यांमध्ये त्यांच्या नावाची दहशत निर्माण झाली आहे.

91

पांच-पांच का पांच, ‘सेठ मर गया, भाव गिर गया’ अशा असंख्य घोषणांच्या आवाजांनी दादर परिसर गजबजून टाकणाऱ्या बेकायदेशीर फेरीवाल्यांवर आता अंकुश लावण्यात आला आहे. गेली कित्येक वर्षे कुणाला जमले नाही ते दादर पोलिस ठाण्यात बदलून आलेले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मृत्युंजय हिरेमठ यांनी करुन दाखवले आहे. केवळ हद्दीपुरते मर्यादित न राहता हिरेमठ यांची दहशत शिवाजी पार्कच्या हद्दीतील बेकायदेशीर फेरीवाल्यांमध्ये देखील निर्माण झाली आहे.

फेरीवाल्यांच्या मुजोरीवर चाप

दादर पश्चिम रेल्वे स्थानक हा परिसर दोन पोलिस ठाण्यांत विभागला गेला आहे. शिवाजी पार्क आणि दादर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या या परिसरात शेकडो फेरीवाले अनेक वर्षांपासून रस्त्यावर ठाण मांडून बसले आहेत. येथील बेकायदेशीर फेरीवाल्यांकडून दादर परिसर व्यापला गेल्यामुळे येथील वाहतुकीला, पादचाऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता. महापालिका असो अथवा पोलिस ठाणे असो, याठिकाणी तक्रारी केल्यानंतर तात्पुरती कारवाई होत होती. दुसऱ्या दिवशी किंवा काही तासांनी तेथील परिस्थिती जैसे थे अशी होत होती. या फेरीवाल्यांवर कुणाचाही धाक नव्हता, कारवाई करणाऱ्यांवर उलट फेरीवाल्यांची दादागिरी असायची. मात्र मागील महिन्याभरापासून येथील बेकायदेशीर फेरीवाल्यांची दादागिरी मोडीत काढण्यात आली आहे.

(हेही वाचाः ‘या’ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे पोलिस दलात पोकळी)

अशी आहे धडक कारवाई

दादर पोलिस ठाण्यात दोन महिन्यांपूर्वी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यातून बदली होऊन आलेले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मृत्युंजय हिरेमठ यांनी येथील अनधिकृत फेरीवाल्यांवर कायदेशीररित्या कारवाई सुरू केली आहे. या कारवाईमुळे दादागिरी करणा-या फेरीवाल्यांची चांगलीच जिरली आहे. हिरेमठ यांनी न थांबता शिवाजी पार्क पोलिस ठाण्याच्या हद्दीत बसणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांना देखील सरळ करुन, त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन हे गुन्हे शिवाजी पार्क पोलिस ठाण्याकडे वर्ग केले आहेत.

नागरिकांमध्ये आनंद, फेरीवाल्यांमध्ये दहशत

वरिष्ठ पोलिस निरीक्षक हिरेमठ यांनी दादर मधील फेरीवाल्यांवर कारवाई सुरू करुन, त्यांना शिस्त लावल्यामुळे नागरिकांकडून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. तर हिरेमठ यांच्या धडक कारवाईमुळे अनधिकृत फेरीवाल्यांमध्ये त्यांच्या नावाची दहशत निर्माण झाली आहे.

(हेही वाचाः पोलिस दलातही कोरोनाचे थैमान… मृतांचा आकडा वाढला)

वरळी कोळीवाड्यात देखील कारवाई

वरळी कोळीवाड्यातील बेकायदेशीर धंद्यांना चाप लावण्यात आलेला असून, येथील बेकायदेशीर दारूचे अड्डे, मटक्याचे धंदे, अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. लॉकडाऊनच्या काळात नियम न पाळणाऱ्यांवर दादर पोलिस ठाण्याकडून कारवाई करण्यात येत आहे. पोलिसांच्या या कारवाईचे अनेकांनी स्वागत केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.