‘ती’ घटना घडली आणि दगडी चाळीची ‘दहशत’ निर्माण झाली!

भायखळ्यातील उडपी हॉटेलचे मालक श्रीधर शेट्टी यांनी गवळी यांना त्यांच्याच दरबारात शिवीगाळ केली होती. यामुळे संतापलेल्या गवळीच्या माणसांनी त्याची हत्या केली आणि खऱ्या रुपाने ही दगडी चाळ नावारुपाला येऊन चाळीची दहशत निर्माण झाली.

101

दगडी चाळ ही एक शतकापूर्वीच बांधण्यात आली होती. या चाळीच्या अवतीभोवती दगडाच्या संरक्षण भिंती असल्यामुळे ही चाळ ‘दगडी भिंत चाळ’ या नावाने ओळखली जाऊ लागली आणि या चाळीचे रुपांतर दगडी चाळीत झाले. अरुण गवळीने रमा नाईक आणि बाबू रेशीम यांच्या टोळीची सूत्रे हाती घेतल्यानंतर, त्याचा गुन्हेगारी प्रवास या चाळीतून सुरू झाला होता. रमा नाईकच्या हत्येनंतर बाबू रेशीमची देखील हत्या झाली. मग अरुण गवळीने दगडी चाळीतच आपला अड्डा तयार केला. अरुण गवळीने ८०च्या दशकात येथील अनेक घरे स्वतः विकत घेऊन त्या ठिकाणी आपले कार्यालय बनवले. गवळी गुन्हेगारीशी संबंधित सर्व प्रकरणे या कार्यलयात हाताळत होता. दक्षिण मुंबईत मुख्यतः भेंडी बाजार, डोंगरी परिसरात दाऊदचे वर्चस्व होते. अरुण गवळीने त्याच्या वर्चस्वाला धक्का पोहचवण्यास सुरुवात केली आणि हिंदू डॉन म्हणून अरुण गवळीने आपली नवीन ओळख निर्माण केली.

चाळीत होता छुपा रस्ता

दगडी चाळीतील तयार करण्यात आलेल्या कार्यालयात गवळीचा दरबार भरू लागला. मुंबई, वसई , ठाण्यातील लोक या दरबारात येऊन आपली गाऱ्हाणी सांगू लागले होते. गवळी आपल्या माणसांमार्फत लोकांच्या समस्या सोडवू लागला. दगडी चाळीतील ३८८ खोल्यांपैकी काही खोल्या टोळीच्या सदस्यांसाठी सुरक्षित घरं बनली होती. सुरुवातीला चार मजली चाळीत साधी १० बाय १२ फूट खोलीतच स्वयंपाकघरं होती. त्या खोल्यांना चाळीपासून जवळच असणाऱ्या खटाऊ गिरण्यांपर्यंत एक छुपा रस्ता तयार करण्यात आला होता. ज्यामुळे पोलिसांच्या छाप्यात गुंडांना पळ काढण्यास मदत झाली. परंतु ही टोळी जसजशी मोठी होत गेली, तसतसे त्याचे सदस्य वाढू लागले आणि त्यांनी खोल्यांमध्ये बदल करण्यास सुरुवात केली.

(हेही वाचाः डॅडींच्या दगडी चाळीचा ‘इतिहास’! (भाग-1))

चाळीभोवती कडक पहारा

चाळीच्या खोलीत लपण्यासाठी अनेक तळघरं तयार करण्यात आली होती. चाळीतून अनेक भुयारे खोदण्यात आली होती, जेणेकरुन पोलिस अथवा इतर टोळीच्या गुंडांपासून बचाव करता येईल. गवळीने दगडी चाळीच्या संरक्षण भिंती देखील मजबूत करुन, मुख्य मार्गिकेत एक लोखंडी फाटक तयार केले होते. हे फाटक केवळ गवळीच्या सांगण्यावरुनच उघडले जात होते. या गेटमध्ये केवळ चाळक-यांना खुला प्रवेश होता, तर इतरांना प्रवेश करताना अनेक गवळीच्या गुंडांच्या आणि चाळीतील तरुणांच्या चौकशांना सामोरे जावे लागत होते. त्याची पूर्ण अंगझडती करुन खात्री पटल्यास आत प्रवेश दिला जात होता.

चाळीत पहिल्यांदाच सांडले रक्त

१९८३ साली चाळीत एक मोठी घटना घडली आणि पाहिल्यांदाच चाळीत रक्त सांडले, डॅडीच्या दरबारात येणाऱ्यांमध्ये अनेक जण हॉटेल व्यवसायिक देखील असायचे. मार्च 1983 मध्ये दगडी चाळीत रक्त सांडले. भायखळ्यातील उडपी हॉटेलचे मालक श्रीधर शेट्टी यांनी गवळी यांना त्यांच्याच दरबारात शिवीगाळ केली, यामुळे संतापलेल्या गवळीच्या माणसांनी त्याची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चाळीच्या आवारात हत्या झाल्याची ही पहिली घटना आहे. त्यानंतरच्या काही महिन्यांत गवळीने अटक टाळण्याचा प्रयत्न केला. पण नंतर त्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. या घटनेमुळे गवळी आणि दगडी चाळीची दहशत संपूर्ण मुंबईत पसरली आणि दगडी चाळ नावारुपाला आली.

(हेही वाचाः …आणि ‘दगडी चाळ’ बनली गवळीचे साम्राज्य!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.