पालघर जिल्ह्यातील डहाणू गावातील चिकू उत्पादक शेतक-यांना बिघडत्या हवेच्या गुणवत्तेमुळे मोठा आर्थिक फटका बसू लागला आहे. डहाणूतील औष्णिक विद्युत प्रकल्प तसेच तारापूर येथील औद्योगिक विकास मंडळ तसेच अॅटोमिक पॉवर प्लान्ट या प्रकल्पांमुळे चिकूचे उत्पादन घटत असून, परिसरातील गावक-यांमध्ये कर्करोगाचा प्रसार वाढल्याचा दावा डहाणू तालुका पर्यावरण संवर्धन संस्थेचे प्रमुख राजीव लांबा यांनी दिली.
(हेही वाचा – महाविकास आघाडी सरकार कोसळणार? पवारांचे दोन शब्दांत उत्तर)
गेल्या तीन वर्षांपासून चिकूच्या उत्पादनात लागवड काळनंतर पिक बहरल्यानंतर संसर्ग आढळून येत असल्याने शेतकरी चिंतेत होते. चिकूची पूर्ण वाढ होण्याअगोदरच झाडावरुन पडून खराब होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागल्यानंतर शेतक-यांनी डहाणू तालुका पर्यावरण संवर्धन संस्थेकडे स्थानिक पातळीवरील वातावरणीय बदलाबाबत ठोस हालचाली करत सरकारपुढे आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली. डहाणू गावातील बिघडत्या हवेचा दर्जा चिकूचे घटते उत्पादन तसेच परिसरात वाढणारी रोगराई, आजार यावर डहाणू तालुका पर्यावरण संवर्धन संस्थेने हेल्दी एनर्जी इनिटीएटिव्ह या पर्यावरणप्रेमी संस्थेच्या माध्यमातून परिसरातील हवेची गुणवत्ता तपासली.
सर्व्हेक्षणाअंती डहाणूतील हवेच्या गुणवत्तेत सूक्ष्म धूलिकणाचे प्रमाण अतिधोकायक पातळीवर पोहोचल्याचा निष्कर्ष मांडल्यानंतर अखेर सरकारने या प्रकरणी लक्ष केंद्रीत करावे, अशी मागणी राजीव लांबा यांनी केली. या संपूर्ण परिसरातील हवेच्या दर्जेचा सरकारी संस्थेच्यावतीने सर्व्हेक्षण केले जावे, तसेच परिसरातील गावक-यांनामध्ये वाढत्या आजारपणाविषयीही तपासण्या केल्या जाव्यात, अशी मागणी डहाणू तालुका पर्यावरण संवर्धन संस्थेकडून केली गेली. यासह चिकूच्या घटत्या उत्पादनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतक-यांना नुकसानभरपाई देण्याची मागणीही राजीव लांबा यांनी केली.
डहाणू गावातील हवेच्या गुणवत्तेतील सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण
अतिधोकादायक पातळीवरील गावे
पटेल पाडा – ६३७.९
मसोळी – ५५९.७
कैनाड-मारपोडा – ३१०.४
कैनाड-नाईकपाडा – २९६.७
धोकादायक पातळीवरील गावांमधील हवेच्या गुणवत्तेतील सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण
नारपाड – १८४.२
पाले – १७७.१
बोर्डी – बारेगाव – १६६.८
शिशुपाडा – अगवन – १५८.३
सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण ढासळले
शंकर पाडा-खूणवले – १३६.५
वाढवण – १२९.३
तनाशी – १२९.२
भट-चिंचणी – ११७.९