जीविकेसाठी डान्स क्लास वगैरे चालवणे याबद्दल समाजाचे सकारात्मक मत नसते. नाच, गाणे, वादन या सारख्या कलांनी फक्त मनोरंजन होऊ शकते त्या पलीकडे दुसरे काही नाही, असे बहुसंख्य लोकांना वाटते. नृत्या विषयी समाजात ज्या भ्रांत समजूती पसरल्या आहेत, त्यांना पुण्याच्या एका युवकाने छेद दिला आहे. सामान्य व्यक्तीला नृत्याचे धडे देणे अवघड असते. तिथे या युवकाने तर चक्क पार्किन्सन ग्रस्तांना मोफत नृत्याचे धडे दिले आहेत.
पार्किन्सनचा ‘प’
गेल्या शतकभरात विज्ञानाने अविश्वसनीय प्रगती केली आहे. पण तरीही असे काही रोग अजूनही राहिले आहेत जे कायमस्वरूपी घालवण्याचे सामर्थ्य विज्ञानाने मिळवलेले नाही. त्याच दुर्धर रोगांपैकी एक म्हणजे पार्किन्सन. हा मेंदूशी संबंधित विकार आहे. यात व्यक्ती स्वत:च्या हालचालींवरचा ताबा हळूहळू गमावते. अशा पार्किन्सन रुग्णांना पुण्याचा ऋषीकेश पवार मोफत नृत्य शिकवतो.
नाईन टू फायच्या पल्याड
पुण्यातल्या एका मध्यम वर्गीय कुटुंबात ऋषीकेश यांचा जन्म झाला होता. इतर मराठी कुटुंबात जसे वातावरण असते तसेच वातावरण त्यांच्या घरी होते. त्यांच्या पालकांची इच्छा होती की त्यांनी एखाद्या ठिकाणी नोकरी करून उदरनिर्वाह करावा. पण अगदी बालपणापासूनच ऋषीकेश यांना काहीतरी वेगळे करायचे होते.
डान्स देणारी शाळा
पुण्यातल्या एका प्रतिष्ठित शाळेत ऋषीकेश यांनी दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या शाळेत शिक्षणेतर उपक्रमांववर विशेष भर दिला जायचा. शांत, अबोल स्वभावाचा ऋषीकेश मोकळपणाने बोलायला लागला ते डान्समधून. कोणत्याही प्रकारचे साचेबद्ध शिक्षण न घेता तो उत्तम डान्स करायला लागला.
शिक्षक बनला दिग्दर्शक
अकरावीत गेल्यावर ऋषीकेशच्या शिक्षिकेला त्याच्यातल्या या विशेष गुणाची पारख करता आली. त्यांनी सांगितले की नृत्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण घे. त्याने शिक्षेकेचे बोलणे मनावर घेतले आणि कथ्थकची शिकवणी घेतली. ऋषीकेश सांगतो की, मी आज जो कोणीही आहे, त्याला त्या शिक्षिका जबाबादार आहेत. त्यांच्यामुळे ऋषीकेशला कळले की डान्स प्रोफेशन होऊ शकते.
प्रेरणेतून प्रयोग
मोठीमोठी पुस्तके वाचून, भाषणे ऐकूनच आत्मविश्वास येतो असे नाही. डान्स करूनही आत्मविश्वास मिळतो यावर ऋषीकेशचा दृढ विश्वास होता. त्यातून त्याला जी कल्पना मिळाली त्याने त्यांच्यासह अनेकांचे आयुष्य कायमस्वरुपी बदलले.
रुग्णालयातच स्टुडिओ
पार्किन्सन झालेले रुग्ण आत्मविश्वास गमावून बसतात. या रोगाला पूर्णत: घालवता येत नाही. फक्त तो रोग कमी करता येतो. पार्किन्सन रुग्णांचा आणि रुग्णालयाचा विश्वास संपादन करण्यासाठी ऋषीकेश थेट संचेती रुग्णालयात पोहोचला. त्यांच्या कलाकलाने घेत युवा शिक्षकाने हसत खेळत डान्स शिकवायला सुरुवात केली. रुग्णांचा विश्वास वाढल्यावर, डान्स थेरेपीचे सकारात्मक परिणाम दिसल्यावर रुग्ण त्यांच्या डान्स स्टुडिओमध्ये यायला लागले. २०११ पासून सुरू झालेल्या या अनोख्या उपक्रमाला तेरा वर्षे उलटून गेली आहेत.
आनंदाचे औषध
डान्स थेरेपीबद्दल डॉ. गुप्ता म्हणाले “रोगाच्या लक्षणांवर प्रामुख्याने औषधाने उपचार केले पाहिजेत. परंतु नृत्य, संगीत आणि फिजिओथेरपी देखील प्रगती कमी करण्यास तितकेच उपयुक्त ठरू शकतात.”
हेही पहा –
Join Our WhatsApp Community