डार्कनेटः ड्रग माफियांचा ऑनलाइन अड्डा! अशी आहे ड्रग्सची ऑनलाइन बाजारपेठ

डार्कनेटचा वापर ड्रग्स माफियांनी देखील सुरू केला असून, ड्रग्ससाठीही ऑनलाइन बाजारपेठा खुल्या करण्यात आलेल्या आहेत.

सर्वच व्यवहार ऑनलाइन होत असताना ड्रग्स माफिया का मागे राहतील, आता ड्रग्स माफियांनी देखील ऑनलाइन बाजारपेठेत उडी घेतली आहे. ड्रग्स माफियांनी ड्रग्स घेणाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ऑनलाइन बाजारपेठा खुल्या करुन दिल्या आहेत. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई विभागाने केलेल्या एका कारवाईत ऑनलाइन ड्रग्स विक्रीच्या धंद्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

डार्कनेट म्हणजे गुन्हेगारांचा अड्डा

डार्कनेट ही वेबसाईट सुरुवातीपासून वादग्रस्त ठरली आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून वेगवेगळ्या बॅन करण्यात आलेल्या वेबसाईटमध्ये सहज प्रवेश करता येतो. डार्कनेट ही आंतरराष्ट्रीय वेबसाईट असून, ती देशासाठी घातक अशी वेबसाईट आहे. या वेबसाईटवर होणारे व्यवहार क्रिप्टो करन्सी मार्फत होत असतात. सुरक्षा यंत्रणा देखील या व्यवहाराबाबत गाफील असून, कुठून कुठे हे व्यवहार होतात याची पुरेशी माहिती सुरक्षा यंत्रणेकडे नाही. ही माहिती उपलब्ध होत नसल्यामुळे या वेबसाईटचा वापर गुन्हेगार, ड्रग्स माफिया, अतिरेकी संघटनांकडून मोठ्या प्रमाणात होत असतो. डार्कनेट वरुन राज्यात अनेक घटना देखील घडल्या आहेत, या वेबसाईटच्या माध्यमातून तरुणांना चुकीचे धडे दिले जात असल्याचे देखील उघडकीस आले आहे.

(हेही वाचाः ड्रग्स विरोधी मोहीम चालवणाराच निघाला ड्रग्स डीलर!)

एनसीबीची कारवाई

या डार्कनेटचा वापर ड्रग्स माफियांनी देखील सुरू केला असून, ड्रग्ससाठीही ऑनलाइन बाजारपेठा खुल्या करण्यात आलेल्या आहेत. केंद्रीय नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने काही दिवसांपूर्वी मुंबईतील अंधेरी, ओशिवरा या परिसरात केलेल्या कारवाई करुन, मोठ्या प्रमाणात एलसीडी स्ट्रीप, गांजा, चरस, हशीस, एमडी आदी अंमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी रवी वाघेला, हर्षद वाघेला, शरद परगी या तिघांना मनवेल पाडा येथून तर शुभम सावर्डेकर ऊर्फ थापा याला अंधेरी लोखंडवाला येथून तर जैद राणा आणि सोनू फैज यांना ओशिवरा येथून अटक करण्यात आली.

असा होतो डार्कनेटद्वारे व्यवहार

एनसीबीच्या चौकशीत एलएसडी,अमेरिकन भांग, गांजा आदी अंमली पदार्थ डार्कनेटमधून खरेदी करण्यात आले आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून विशेष सॉफ्टवेअरद्वारे डार्कनेट वेबसाइट्समध्ये प्रथम प्रवेश केला जातो. त्यानंतर, केवळ डार्कनेटद्वारे योग्य प्रवेश असलेल्या विविध वेबसाइट्सवर प्रवेश केला जाऊ शकतो. या साइट्समध्ये विविध विक्रेते आहेत, जे विविध औषधे विक्रीमध्ये तज्ज्ञ आहेत. यापैकी कोणीही विक्रेते त्यांची खरी ओळख उघड करत नाहीत. ज्या व्यक्तीस ड्रग्स खरेदी करण्याची इच्छा असते त्याने अज्ञात मेसेंजर सेवांचा वापर करुन, ग्राहकांना ड्रग्स विक्रेत्यांशी संपर्क साधून ड्रग्सच्या किमतीची विचारपूस करण्यास सांगण्यात येते. एकदा का ग्राहकाने उत्पादन खरेदी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ड्रग्सच्या वितरणासाठी पत्ता पाहिला जातो. हे सर्व व्यवहार बिटकॉइन सारख्या क्रिप्टो करन्सीद्वारे व्यवहार पूर्ण केले जात असल्याची माहिती एनसीबीचे मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here