महाराष्ट्रातील देवींच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक महत्त्वाचं मानलं जाणारं शक्तिपीठ म्हणून सप्तश्रृंगी देवीची ओळख आहे. सप्तश्रृंगी देवीच्या भाविकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. नाशिक जिल्ह्यातील संप्तश्रृगी देवीचे मंदीर तब्बल ४५ दिवस म्हणजेच दीड महिने बंद राहणार असल्याचे सांगितले जात आहे. सप्तश्रृंगी देवीच्या मूर्तीते संवर्धन आणि देखभालीचे काम करण्यासाठी २१ जुलै ते ५ सप्टेंबर २०२२ या ४५ दिवसांच्या कालावधीत सप्तशृंगी गड वणी येथील सप्तश्रृंगी मंदिर बंद राहणार असल्याची माहिती विश्वस्त मंडळाकडून देण्यात आलेली आहे.
भक्तांसाठी अशी असणार व्यवस्था
या ४५ दिवसांच्या काळात श्री भगवती स्वरूप मुर्तीचे संवर्धन व देखभाल कामकाजाच्या अनुषंगाने नियोजन सुरु करण्यात आले आहे. सद्यस्थितीत कार्यरत अध्यक्ष व विश्वस्त मंडळ यांनी शासनाच्या पुरातत्व विभाग, आय आय टी, पवई (बॉम्बे) यांच्यासह अजिंक्यतारा कन्सल्टंसी यांच्यामार्फत पुर्तता तसेच तज्ञ मार्गदर्शन प्राप्त करून भगवती स्वरूप / मुर्ती संवर्धन व देखभाल संबंधीत पुर्तता होणे दृष्टीने कामे केली जाणार आहेत. त्यानुसार श्री भगवती स्वरुप, मुर्ती संवर्धन व देखभाल अनुषंगीक पुर्ततेसाठी गुरुवार २१ जुलैपासून पुढील ४५ दिवस सप्तश्रृंगी मंदिर भाविकांसह सर्वांना प्रत्यक्ष दर्शनासाठी संपुर्णत: बंद राहणार आहे. मात्र विश्वस्त संस्थेच्या पहिली पायरी येथे असलेल्या उपकार्यालय नजीक सप्तश्रृंगी देवीची हुबेहुब प्रतिकृती भाविकांच्या पर्यायी दर्शनाची व्यवस्था म्हणून कार्यरत केली जाणार आहे.
(हेही वाचा – भाजपा-शिवसेनेत नैसर्गिक युती व्हावी आणि झाल्यास…, सेनेच्या खासदारानं स्पष्टच सांगितलं)
भिंत तुटून पावसाचे पाणी पायऱ्यांवर
दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात ढगफुटीसारखा पाऊस झाला. अशातच सोमवारी सप्तश्रृंगी गडावर भाविक परतीच्या मार्गाने जात असताना खाली उतरत असताना संरक्षक भिंत तुटून पावसाचे पाणी पायऱ्यांवर खाली आले. यावेळी सप्तश्रृंगी गडाच्या मंदिराच्या खालच्या भागात असलेल्या दुकानांचे मोठे नुकसान झाले. पाण्याचा जोर इतका जास्त होता की, त्यामुळे गडावरील संरक्षक भिंतीवरील माती आणि दगड खाली कोसळले. या घटनेत दोन मुलांसह सहा भाविक जखमी झाल्याची माहिती मिळतेय.
Join Our WhatsApp Community