राज्यातील वन्यप्राण्यांची गोपनीय माहिती धोक्यात 

127

राज्यातील वनविभागाकडून शहर तसेच जंगल भागांत वन्यप्राणी शिरल्यास होणा-या बचाव कार्याची दरदिवसाची तपशीलवार माहिती सॉफ्टवेअरच्या माध्यमातून पुण्यातील खासगी प्राणीप्रेमी संस्थेकडून गोळा केली जात आहे. नागपूर येथील वनविभागाच्या मुख्य कार्यालयातही तपशीलवार माहिती मिळण्यात अद्यापही मर्यादा येत असताना, वनविभागाच्या अधिका-यांकडून ही माहिती दररोज पुण्यातील खासगी वन्यप्राणी संस्थेला देण्याबाबत वन्यप्रेमींनी तसेच वनविभागाकडून नियुक्त मानद वन्यजीव रक्षकांनी आक्षेप नोंदवला आहे.

शुक्रवारपासून नागपूर येथील पेंच अभयारण्यात राज्य मानद वन्यजीव रक्षकांच्या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेत राज्यातील अभयारण्यात तसेच व्याघ्र प्रकल्पात सुरु झालेल्या रात्रीच्या सफारीला मानद वन्यजीव रक्षकांकडून कडाडून विरोध केला जाईल. पुण्यातील खासगी वन्यप्रेमी संस्था वनविभागाशी थेट संलग्न नाही. केवळ तांत्रिक पाठबळ देत सॉफ्टवेअर वनविभागासाठी बनवून दिल्यानंतर केवळ वनाधिका-यांकडूनच माहितीचे  संचलन व्हायला हवे. इतरजणांचा सहभाग असल्यास दुर्मिळ पक्षी, प्राणी व त्यांच्या अधिवासाची गोपनीयता पाळली जाईल का, असा प्रश्न मानद वन्यजीव रक्षकांकडून विचारण्यात आला.
वेळ आल्यास न्यायालयात जाणार 
नागपूर येथील रामगिरी परिसरातील वनविभागाच्या वन्यजीव विभागाच्या मुख्य कार्यालयात राज्यातील विविध भागांत वन्यप्राण्यांच्या बचाव कार्याच्या माहितीच्या तपशीलाची मर्यादित स्वरुपात माहिती उपलब्ध आहे. ही कबुली स्वतःहून वनाधिकारी देतात. दिवसाचे तपशील वनविभागाच्या विभागनिहाय कार्यालयातूनच उपलब्ध होतात. प्रत्येक विभागाच्या वनविभागाच्या कार्यालयाकडून पुरेशी आणि व्यवस्थित मांडणीस्वरुपात माहिती मिळत नाही, त्यामुळे खासगी वन्यप्राणी संस्थेकडून सॉफ्टवेअरबाबत प्रस्ताव स्वीकारला गेला. अंदाजे २०१७ पासून कार्यरत असलेल्या पुण्याच्या खासगी वन्यप्राणी संस्थेने तयार केलेले सॉफ्टवेअर प्रत्येक कार्यालयाला देण्यात आले आहे. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून खासगी वन्यप्राणी संस्थाच माहिती गोळा करते. या माहितीची वनविभागाला पारदर्शकता आहे का असा प्रश्नही मानद वन्यजीव रक्षकांच्या गटातून उपस्थित करण्यात आला. राज्यातील वन्यप्राण्यांची, त्यांच्या ठिकाणांची माहिती गोळा करुन वाईट हेतूसाठी वापरली जाण्याची भीतीही मानद वन्यजीव रक्षकांच्या गटातून व्यक्त करण्यात आली.
ताडोबा तसेच पेंच व्याघ्र प्रकल्पात सुरु झालेली नाईट सफारी, कोल्हापूरातील राधानगरीतील काजवा महोत्सव तसेच साता-यातील कांस पठारावरील नाईट सफारीबाबतही मानद वन्यजीव रक्षकांनी जोरदार आक्षेप नोंदवला. वेळ आल्यास न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याची तयारीही वन्यजीव प्रेमींनी दर्शवली.
नाईट सफारीमुळे वन्यजीवांच्या रात्रीच्या भ्रमणावर गदा येण्याची भीती आहे. पर्यटनाच्या माध्यमातून दिवसा व रात्री केवळ महसूलाचा विचार करत मूक्या वन्यप्राण्यांना त्रास देणे योग्य नाही. राजकीय हितसंबंधातील व्यावसायिकांच्या जंगलांनजीकच्या हॉटेल व्यवसायाला चालना देण्यासाठी हा प्रकार सुरु आहे. वनक्षेत्रात पर्यटनाला मर्यादा असावी. -डॉ किशोर पाठक, मानद वन्यजीव रक्षक, औरंगाबाद वनविभाग
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.