औदुंबराच्या पानावर ‘श्री दत्त गुरू’ अवतरले…

122

दत्त जयंती दिनाच्या पूर्वसंध्येला चित्रकार कौशिक जाधव यांनी औदुंबराच्या पानावर श्री दत्त गुरूंचे चित्र रेखाटले आहे. या चित्राची संकल्पना दत्तात्रय ही तीन मुखं असलेली देवता औदुंबर वृक्षाखाली यज्ञकुंडासमोर अथवा अग्नीसमोर बसलेली दिसते. गळ्यात रुद्राक्षमाळा, अंगावर भस्माचे पट्टे, समोर चार श्वान, मागे धेनू असा परिसर दिसून येतो. दत्तात्रय फक्त पितांबर नेसलेल्या अवस्थेत ध्यानस्थ बसलेले दिसतात. रुद्राक्ष, अंगावर चर्चिलेली विभूती यांवरून ते कैलासावर राहणाऱ्या महादेवांचे ध्यान करत असल्याचे दिसते.

(हेही वाचा- दिन विशेष: ‘अल्पसंख्यांक हक्क दिवस’!)

श्रीदत्तात्रेय अवतार हा उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही स्थितींचा निर्देशक आहे. तसेच तो त्रिगुणात्मक म्हणजे सत्त्व, रज आणि तम या तिन्ही गुणांनी युक्त आहे. म्हणूनच ‘त्रिगुणात्मक त्रिमूर्ती श्रीदत्त’ असे म्हंटलेलं आहे. श्री दत्तात्रय ध्यानातील प्रतीकात्मक तीन मुखे ही ब्रह्मा, विष्णू, महेशांचे प्रतीक आहेत. सहा हात हे ब्रह्मा-विष्णू-महेशाचे प्रतीक असून ब्रह्माच्या हातातील माला व कमंडलू, तपस्व्याच्या ‘सत्त्वा’चे प्रतीक म्हणता येईल. विष्णूच्या हातातील शंख आणि चक्र ही आयुधे ‘रजा’चे, तर महेशाच्या हातातील त्रिशूल आणि डमरू ‘तमा’चे म्हणजेच संहाराचे प्रतीक मानले जाते.

पुराणातील दत्तात्रेयांचे स्वरूप श्री विष्णूंसारखे असले तरी मस्तकी जटाभार, पायी खडावा, अंगाला विभूती चर्चिलेली, काखेत लटकवलेली झोळी, व्याघ्रांबर परिधान केलेली मूर्ती तो अवधूत दिगंबर योगी असल्याची द्योतक आहे. धेनू हे ‘पृथ्वी’चे किंवा ‘माये’चे प्रतीक मानले जाते. दत्तात्रेयांच्या आसपास असणारे चार श्वान वेदांचे प्रतीक असल्याचे सांगितले जाते. भिक्षा मागण्यासाठी नाथजोगी जेव्हा गावोगावी सातत्याने संचार करत, तेव्हा त्यांच्याबरोबर गाईंची खिल्लारे आणि त्यांच्या रक्षणासाठी श्वान असत. श्री दत्तात्रेयांचा निवास सतत औदुंबरतळी असतो अशी श्रद्धा असल्यामुळेच अनेक दत्तभक्त आजही ‘गुरुचरित्रा’चे पारायण तेथे आवर्जून करतात.

चित्रकार कौशिक जाधव यांच्याबद्दल…

चित्रकार कौशिक जाधव हे मुळचे वसई येथील भाताने तालुक्यातील रहिवासी असून ते सध्या न्यू इंग्लिश स्कूल, वसई येथे कला शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या चित्रांमुळे ते सर्वत्र प्रसिद्ध आहेत. दगडांवरील क्रांतिकारांचे चित्र, फळभाज्यांवरील अष्टविनायक तसेच आता त्यांनी श्री दत्त जयंती निमित्त औदुंबराच्या पानावर साकारलेले श्री दत्त गुरू. त्यांच्या या कलेचे कौतुक न्यू इंग्लिश स्कूल, वसईच्या प्राचार्या एस. एल. वाझ तसेच सहशिक्षक प्रा. अभिजीत ऐवळे, अभिमान पाटील, प्रा. देवानंद, दत्तात्रय ठोंबरे, ठाकूर, कुणाल वझे यांनी केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.