जगातला एकमेव ‘गीताग्रंथ’ ज्याची साजरी केली जाते जयंती!

109

मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला गीता जयंती साजरी केली जाते. यंदा १४ डिसेंबर रोजी गीता जयंती साजरी होत आहे. गीता जयंती म्हणजे तोच दिवस, महाभारत युद्धाच्या वेळी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला कुरुक्षेत्रावर भगवद्गीता सांगितली होती. त्या अर्थाने गीतेचा जन्म या दिवशी झाला, म्हणून त्या दिवसाला गीता जयंती म्हटले जाते. जगातला एकमेव गीताग्रंथ असा ग्रंथ आहे की ज्याची जयंती साजरी केली जाते. हीच घटना गीतेचे वैशिष्ट्य अधोरेखित करते.

…म्हणून साजरी होते गीता जयंती

मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्ष एकादशीच्या तिथीला गीता जयंती साजरी केली जाणारी आहे. या एकादशीला मोक्षदा एकादशी म्हणून ही संबोधले जाते. पौराणिक मान्यतेनुसार, अघन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला भगवान श्रीकृष्णाने आपल्या मुखाने गीतेचा उपदेश दिला होता. द्वापर युगात भगवान श्रीकृष्ण कुरुक्षेत्र मध्ये महाभारताचे युद्ध सुरु होण्यापूर्वी अर्जुनाला जीवन-मरण, मोह-मायाच्या चक्रातून मुक्त करण्यासाठी गीतेचा उपदेश दिला होता. यासाठीच अगहन महिन्याच्या शुक्ल पक्षातील मोक्षदा एकादशीच्या दिवशी गीता जयंती साजरी केली जाते.

जगात चांगले कसे वागावे आणि जीवन चांगले कसे जगावे हे गीता शिकल्यामुळे समजते. थोरो नावाचा एक महान तत्ववेत्ता १२ जुलै १८१७ यादिवशी अमेरिकेतल्या मॅसॅच्युटेस या संस्थानातील कंकॉर्ड या गावी जन्माला आला. त्याच्या घरची परिस्थिती उत्तम होती. हॉवर्ड विद्यापीठाचा तो पदवीधर झाला. प्रसिद्ध तत्ववेत्ता इमर्सन हा थोरो पेक्षा मोठा पण त्याच्याच गावचा. इमर्सन म्हणत असे Geeta means empire of thoughts. (गीता विचारांचे साम्राज्य आहे.) इमर्सनची एक जागा वॉल्डेन नावाच्या एका रम्य तळ्याकाठी होती. तेथे थोरोने आपले घर बांधले आणि तो तिथे राहू लागला. लोक कुऱ्हाडीचा उपयोग झाडे तोडण्यासाठी करतात हे पाहून थोरो म्हणायचा, माणसांची कुऱ्हाड ढगावर चालू शकत नाही ही देवाचीच कृपा आहे.

‘आदर्श जीवनाचे रहस्य म्हणजे…’

जीवन चांगले कसे जगावे आणि जगात चांगले कसे वागावे याचा आदर्श म्हणजे थोरो असे पाश्‍चात्त्य जगतातील लोक सांगतात. या थोरोला अनेकांनी विचारले,”तुमचे जीवन इतके आदर्शवादी कसे आहे? “लोकांच्या या प्रश्नाला उत्तर देताना थोरो म्हणाला, “माझ्या आदर्श जीवनाचे रहस्य म्हणजे मी रोज पहाटे उठल्यावर गीता वाचतो. जगातील कोणतेही साहित्य हे गीते पुढे अत्यंत सामान्य आहे. श्रीकृष्ण आणि त्याची गीता यांचा विचार ज्या वेळेला मी करतो त्या वेळी मला अतिशय आनंद होतो. अनेक लोकांना वाटते श्रीकृष्णाचा विचार म्हणजे विकृती आहे. पण माझ्या मते काही लोकांना वाटणारी हीच विकृती खरी प्रकृती आहे. खरी संस्कृती आहे. श्रीकृष्णाचे विचार आपल्या जीवनात उतरवणे ही खरी संस्कृती आहे. ते खरे सत्कृत्य आहे. भारतीय संस्कृतीचा सर्वात मोठा आधार म्हणजे गीता सांगणारा श्रीकृष्ण आहे.”

साऱ्या जगाचा एकच धर्म होईल तेव्हा…

हिंदुस्थानचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणतात, “सत् तत्वाचा सर्वांगीण साक्षात्कार झालेला द्रष्टा पुरुष म्हणजे श्रीकृष्ण ! अखिल मानव जातीला अत्यंत उपयुक्त असलेले तत्वज्ञान म्हणजे श्रीकृष्णाने सांगितलेले गीतेतील तत्त्वज्ञान होय.” एफ टी ब्रुक्स म्हणतो, “हिंदुस्थानातील लोकांना ऐक्याच्या धाग्यात बांधणारा अद्वितीय ग्रंथ म्हणजे श्रीकृष्णाने सांगितलेली गीता. जेव्हा साऱ्या जगाचा एकच धर्म होईल तेव्हा त्या धर्माचा ग्रंथ म्हणजे गीता ग्रंथ असेल.”

मानवला मार्गदर्शन करणारा सर्वोत्कृष्ट ग्रंथ

गीतेचे हे महात्म्य ही थोरवी आपण लक्षात घेऊन गीता ग्रंथाचे अध्ययन करणे हे आपल्या हिताचे आहे. संपूर्ण मानव जातीला मार्गदर्शन करणारा सर्वोत्कृष्ट ग्रंथ म्हणजे गीता ग्रंथ ! एवढेच या गीता जयंतीच्या निमित्ताने आपणास सांगायचे आहे.

  • दुर्गेश जयवंत परुळकर

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.