मुंबईत विलेपार्लेमध्ये घडलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. २५ वर्षाच्या मुलाची आई आणि बहिणींकडून झालेल्या हत्येप्रकरणी जुहू पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिघींना अटक केली आहे. वेड्याचे झटके आल्यानंतर तो स्वतःला इजा करून घेणे, आत्महत्येचा प्रयत्न करीत असे त्याला होणारा त्रास आई बहिणींना बघवत नव्हता, रविवारी सायंकाळी त्याला वेड्याचे झटके आले आणि तो स्वतःला इजा करीत असताना त्याला शांत करण्याच्या प्रयत्नात आई आणि बहिणीकडून त्याचा गळा दाबला गेला आणि यातच त्याचा मृत्यू झाला.
शांत करण्याच्या प्रयत्नात गळा दाबला
जुहू पोलिस अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, २५ वर्षीय राजेश कमरुद्दीन इंदोरेवाला हा आई आणि बहिणी सोबत विलेपार्ले पश्चिम नेहरू नगर या ठिकाणी राहण्यास होता. मुंबईतील एका महाविद्यालयात सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या राजेश याला वेड्याचे झटके येऊ लागल्यामुळे तो वेडाच्या भरात तो हिंसक वागू लागला आणि त्याला त्याची नोकरी गमवावी लागली. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, इंदोरेवाला याला जेव्हा वेड्याचे झटके येत होते तेव्हा तो हिंसक बनत होता, त्यात तो स्वतःला इजा पोहचवणे, आत्महत्येचा प्रयत्न करणे या सारखे भयानक प्रकार करीत होता. रविवारी इंदोरेवाला हा त्याच्या राहत्या घरच्या छतावर चढला व तेथून उडी मारण्याचा प्रयत्न करू लागला इतक्यात त्याची आई दुर्गेश्वरी इंदोरेवाला आणि बहिणी सुमन आणि कृष्णा यांनी त्याला पकडले आणि त्याचे प्राण वाचावे म्हणून त्याला दोरीने बांधून ठेवले.
( हेही वाचा : MHADA Lottery: मुंबईत 3015 घरांची सोडत)
त्यानंतर तो जास्तच आक्रमक झाला आणि त्याने दोरी सैल करून पुन्हा छतावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. तो आत्महत्या करणार असल्याने आई आणि बहिणींनी त्याला शांत करण्याच्या प्रयत्नात त्याचा गळा दाबला असता तो बेशुद्ध झाला, त्याला त्याच अवस्थेत कूपर रुग्णालयात आणण्यात आले, डॉक्टरांनी त्याला तपासले असता त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची माहिती जुहू पोलिसांना दिली. पोलिसांनी रुग्णालयात धाव घेऊन हत्येचा गुन्हा दाखल करून आईसह त्याच्या बहिणींना अटक करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community