मुंबई प्रतिनिधी
भारतीय रेल्वेची पॅलेस ऑन व्हील्स (Palace on Wheels) या योजनेनुसार सुरू करण्यात आलेली डेक्कन ओडिसी (Deccan Odyssey) ट्रेन शाही पाहुणचारसाठी ओळखली जाते. शान-ओ-शौकतचे उदाहरण असलेली ही ट्रेन, व्हीलवरचा चालता-फिरता राजमहल आहे. ही डेक्कन ओडिसी ट्रेन १६ जानेवारी २००४ मध्ये सुरू झाली होती. मात्र कोरोना महामारीमुळे अख्खे जग थांबले अर्थात पर्यटनही थांबले. मात्र सध्या डेक्कन ओडिसी ट्रेन अत्याधुनिक सोयी सुविधेने पुन्हा पर्यटकांच्या सेवेकरिता सुरू होत आहे.
आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलेली डेक्कन ओडिसी (Deccan Odyssey) ट्रेन २.० नव्या रुपात धावण्यास सज्ज झाली आहे. डेक्कन ओडिसी २.० या ट्रेनचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, फलाट क्रमांक १८ येथे गुरूवारी २१ सप्टेंबर ला दुपारी २ वाजता विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रध्दा जोशी-शर्मा, भारतीय रेल्वेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी मान्यवरांना घेवून ही ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे असा प्रवासही करणार आहे.
देशातील प्रसिध्द ४ शाही रेल्वेपैकी एक असणारी आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलेली डेक्कन ओडिसी ट्रेन २.० ही नव्या रुपात पुन्हा पर्यटकांसाठी खुली होणार आहे. या ट्रेनमध्ये उच्च दर्जाच्या सोयीसुविधा देण्यात येतात. २००४ ते २०२० पर्यंत या अलिशान व आरामदायी ट्रेनला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.
शाही वागणूक मिळणाऱ्या या ट्रेनमध्ये दोन मल्टी-कुजीन रेस्तरां पेशवा-१ आणि पेशवा -२ असे हॉटेल्स आहेत. डेक्कन ओडिसी (Deccan Odyssey) ट्रेनच्या कोचमध्ये पर्सनल सेफ, टेलीफोन आणि अटैच्ड बाथरूम, जिम उपलब्ध आहेत. ही ट्रेन पूर्णतः एयर कंडीशनर आणि इंटरनेट कनेक्टिविटीने युक्त आहे. या नूतनीकरण करण्यात आलेल्या डेक्कन ओडिसी सहलींमध्ये महाराष्ट्र व्यतिरिक्त देशातल्या अन्य राज्यामधील पर्यटन स्थळांचाही समावेश करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community