मुंबई महापालिकेचे विद्यार्थी आता आर्थिक साक्षरतेतून आत्मनिर्भरतेकडे!

158

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांना जीवनातील गणित वजाबाकीची माहिती देत आर्थिक सक्षम बनवण्याच्या दृष्टिकोनातून आर्थिक शिक्षणाचे धडे देण्याचा निर्णय घेत याबाबतचा मुंबई महापालिका आणि स्टॉक एक्सचेंज (BSE) इन्स्टिट्यूट लि. याच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणाऱ्या मिशनचा सोमवारी शुभारंभ करण्यात आला. या माध्यमातून मुलांना भविष्यात आर्थिक गुंतवणुकीची सर्व माहिती करून देत त्यांना आर्थिक साक्षरतेचे सक्षम बनवत आत्मनिर्भर बनवण्याच्या प्रयत्न केला जाणार आहे. शिवाय भविष्यातील महाविद्यालयीन शिक्षणाच्या दृष्टीकोनातून त्यांचा पायाही शालेय शिक्षणात मजबूत करण्याचा प्रयत्न महापालिका शिक्षण विभागाच्यावतीने होत आहे.

आर्थिक साक्षरता मिशनचा शुभारंभ

मुंबई महानगरपालिका आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) इन्स्टिट्यूट लि. च्या यांच्या संयुक्त प्रयत्नातून आर्थिक साक्षरता मिशन हाती घेण्यात आले आहे. या अंतर्गत महानगरपालिकेच्या इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांसाठी आर्थिक साक्षरतेचे धडे देण्याकरिता अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला आहे. या मिशनचा शुभारंभ राज्याचे पर्यटन, पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इमारतीतील आंतरराष्ट्रीय सभागृहात सोमवारी करण्यात आला. बृहन्मुंबई महानगरपालिका आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) इन्स्टिट्यूट लि. यांच्या दरम्यान आर्थिक साक्षरता मिशन संदर्भात करण्यात आलेल्या सामंजस्य कराराची प्रत देवाण-घेवाण याप्रसंगी करण्यात आली. तसेच आर्थिक साक्षरतेचे धडे देण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाची पुस्तिका देखील यानिमित्ताने प्रकाशित करण्यात आली.

(हेही वाचा – मुंबई महापालिका शाळांच्या मुलांना आर्थिक साक्षरतेचे धडे)

मुंबई महानगरपालिकेच्या शैक्षणिक सेवा-सुविधांमध्ये आमूलाग्र बदल करुन विद्यार्थ्यांच्या चौफेर विकासासाठी शिक्षणासोबत वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. त्यामध्ये आता आर्थिक साक्षरता अभ्यासक्रमाच्या रुपाने मोलाची भर पडली आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांसह समाजासाठी, देशासाठी महत्त्वाचा आहे. मुंबईप्रमाणेच राज्यातील इतर शहरांमध्ये, शाळांमध्ये आणि शेतकऱ्यांपर्यंत देखील आर्थिक साक्षरता नेण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे उद्गार यावेळी बोलतांना आदित्य ठाकरे यांनी काढले.

New Project 1 10

अवघ्या ४५ दिवसात आर्थिक साक्षरता मिशन प्रत्यक्ष सुरु

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांच्या इमारती आकर्षक आणि सर्व सुविधापूर्ण केल्या जात आहेत. विद्यार्थ्यांच्या पाठीवरुन दप्तरांचे ओझे कमी करण्यासाठी ५४ हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना टॅब दिले गेले आहेत. ६०० शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरुम उपक्रम राबवला जात आहे. आता स्मार्टबोर्ड उपलब्ध करुन दिले जातील. संगणक प्रयोगशाळा, खगोलीय प्रयोगशाळा सुरु करण्यात आल्या आहेत. निरनिराळ्या आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत मिळून वेगवेगळे क्रीडाप्रकार, कला, बॅलेसारखे नृत्यप्रकार विद्यार्थ्यांना शिकता येत आहेत. स्वच्छता, लैंगिक समानता यासारखे सामाजिक पैलू विकसित केले जात आहेत. शिक्षण खात्यातील या बदलांना प्रत्यक्षात आणण्यासाठी अधिकारदेखील वाढवून दिले, असे ठाकरे यांनी नमूद केले. प्राथमिक चर्चा झाल्यानंतर अवघ्या ४५ दिवसांमध्ये महानगरपालिकेच्या शिक्षण खात्याने आर्थिक साक्षरता मिशन प्रत्यक्ष सुरु केले असल्याचे सांगून ठाकरे यांनी त्याबद्दल शिक्षण खात्याचे कौतुकही केले.

विद्यार्थ्यांसह महिलांनाही आर्थिक स्वावलंबानाचे धडे आवश्यक

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे आशीष कुमार चौहान म्हणाले की, सुमारे १४७ वर्षांची परंपरा असलेले बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे जगात भांडवली बाजारांच्या यादीत ५ व्या क्रमांकावर आहे. भारतातील एकूण राष्ट्रीय संपत्तीच्या ३० टक्के संपत्ती या एकट्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमुळे निर्माण झाली आहे. देशातील १० कोटी लोक आता भांडवली बाजारात गुंतवणूक करतात. देशातील प्रत्येक नागरिकाला पैसा कसा कमवावा, बचत कशी करावी, गुंतवणुकीतून संपत्तीची वृद्धी कशी करावी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक संकट टाळण्यासाठी कर्ज व उधारीची परतफेड कशी करावी, हे कळणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांप्रमाणेच महिलांना देखील आर्थिक स्वावलंबानाचे धडे दिले जाणे गरजेचे आहे, असे चौहान यांनी नमूद केले. मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातूनच आर्थिक साक्षरता मिशन सुरु करण्यात आले आहे, याचा आवर्जून उल्लेख करीत समाज सुदृढ करण्याचे काम यातून होणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

नवीन शैक्षणिक वर्षापासून आर्थिक साक्षरतेचे धडे मिळणार

सह आयुक्त अजीत कुंभार यांनी प्रास्ताविक करताना आर्थिक साक्षरता मिशनचे स्वरुप स्पष्ट केले. या मिशनमध्ये १०० मास्टर ट्रेनर्सना आर्थिक साक्षरतेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मास्टर ट्रेनरच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या इतर सर्व शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाईल. या सर्व शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना येत्या जूनमध्ये सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षापासून आर्थिक साक्षरतेचे धडे मिळणार आहेत. परिणामी, विद्यार्थ्यांपर्यंत आर्थिक ज्ञान पोहोचविण्यासाठी मोलाची मदत होईल. व्हर्च्युअल क्लासरुमच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हे प्रशिक्षण पोहोचविले जाईल, असे सांगून शिक्षण विभागाच्या कामगिरीत झालेल्या प्रगतीचा थोडक्यात आढावादेखील कुंभार यांनी सादर केला.

याप्रसंगी स्थानिक खासदार अरविंद सावंत, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, शिक्षण समितीच्या माजी अध्यक्षा संध्या दोशी-सक्रे, सह आयुक्त (शिक्षण) अजीत कुंभार, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक कुमार चौहान, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इन्स्टिट्यूट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अंबरीश दत्ता, महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी राजेश कंकाळ, शिक्षण अधिकारी राजू तडवी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.