अमरनाथ यात्रेला शनिवार १ जुलै पासून सुरुवात होत आहे. त्यापार्श्वभूमीवर यात्रेकरूंची पहिली तुकडी आज, शुक्रवारी सकाळी रवाना झाली. यावेळी लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. “हर हर महादेव”चा जयघोष करत भाविकांनी प्रवासाला सुरुवात केली. यावेळी ही यात्रा ६२ दिवस चालणार आहे. पहिल्या दिवशी बालटाल मार्गासाठी एकूण २१८९ यात्रेकरूंना टोकन देण्यात आले त्यापैकी बालटाल मार्गासाठी १३५ यात्रेकरूंची तात्काळ नोंदणी पंचायत भवन नोंदणी केंद्रावर झाली. बालटालहून जाणारा छोटा रस्ता यंदा खूप विकसित झाला आहे. या १६ किमीच्या मार्गावर १० किमी कच्चा-पक्का रस्ता तयार झाल्याने मार्ग सुकर झाला आहे. तथापि, ६ किमी रस्ता अद्याप अरुंद आहे. यात्रेची सुरक्षा ५ स्तरांमध्ये विभागली आहे.
(हेही वाचा – फडणवीस आणि शिंदे यांनी घेतली अमित शाह यांची भेट; शिंदे गटातील दोन खासदारांना केंद्रीय मंत्रिमंडळात मिळणार स्थान)
तसेच अमरनाथ यात्रा यावेळी पूर्णपणे तंबाखूमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे यात्रा मार्गातील सर्व थांब्यांवर तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच मागच्यावर्षी यात्रेच्या वेळी पवित्र गुहेजवळ ढगफुटीमुळे पूर आला होता. त्यामुळे दरड आणि दगड कोसळण्याच्या घटना लक्षात घेता अडीच किमीच्या अतिजोखीम क्षेत्रात यात्रेकरूंसाठी हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे.
यावर्षी २८ जूनपर्यंत सुमारे ३.०४ लाख लोकांनी अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी केली आहे. हा आकडा गेल्यावर्षीच्या तुलनेत दहा टक्के अधिक आहे.
हेल्मेट सक्ती निःशुल्क
श्री अमरनाथ विश्वस्त मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनदीप कुमार भंडारी यांनी मंडळाकडून हेल्मेट निःशुल्क दिले जाणार असल्याची माहिती दिली आहे.
यात्रेकरूंसाठी ‘ऑन द स्पॉट’ नोंदणी
अमरनाथ तीर्थयात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी प्रशासनाने गुरुवारी (२९ जून) जागेवरच नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. या यात्रेसाठी साधूंसह १,५०० हून अधिक यात्रेकरू जम्मू शहरात पोहोचले आहेत. अनोंदणीकृत यात्रेकरूंच्या जागेवरच नोंदणीसाठी शहरातील शालिमार परिसरात केंद्र सुरू करण्यात आले आहे, तर पुरानी मंडईतील राममंदिर संकुलात साधूंच्या नोंदणीसाठी विशेष शिबिर सुरू करण्यात आले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community