आदित्य ठाकरेंनी नेम साधत केले रायफल शूटिंग प्रशिक्षण केंद्राचे लोकार्पण

106

वरळीमध्ये जे. के. कपूर चौकाजवळ रायफल रेंज येथे महाराष्ट्र रायफल असोसिएशन संचलित शूटिंग प्रशिक्षण केंद्र आहे. या केंद्रात मुंबई महानगरपालिकेने नूतनीकरण केलेल्या १० मीटर शूटिंग रेंजचे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे पर्यटन पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आणि स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी केले. आदित्य ठाकरे यांनी नेम धरत हे लोकार्पण केले आहे.

( हेही वाचा : सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कसा निश्चित केला जातो? जाणून घ्या कसा होणार फायदा)

या रायफल शूटिंग क्रीडा प्रशिक्षण केंद्राच्या नूतनीकरणात १० मीटर रेंज उपलब्ध झाल्यानंतर आता २५ आणि ५० मीटर रेंजदेखील उपलब्ध केली जाणार आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे प्रशिक्षण केंद्र बनवले जात आहे. महाराष्ट्र रायफल असोसिएशनच्या माध्यमातून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जागेवर संचलित या रायफल रेंजमधील विविध रेंजचे नूतनीकरण गेली काही वर्ष प्रस्तावित होते. पैकी, १० मीटर रेंजचे नूतनीकरण महानगरपालिकेने पूर्ण केले आहे. या रेंजच्या जागेत नव्याने बनविलेले छत, विद्युत प्रकाश योजना यासह रेंजसाठी आवश्यक सर्व गोष्टी आंतरराष्ट्रीय मानकानुसार केलेल्या आहेत. अशोक पंडित, अंजली भागवत, सुमा शिरुर यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय नेमबाजांनी या केंद्रातून धडे गिरवले आहेत. आता २५ आणि ५० मीटर रायफल रेंजचे नूतनीकरण हाती घेणार असून त्यामुळे वरळी रायफल रेंज आंतरराष्ट्रीय दर्जाचे रायफल शूटिंग क्रीडा प्रशिक्षण केंद्र म्हणून नावाजले जाईल, असे ठाकरे यांनी नमूद केले. क्रीडापटूंसह पोलीसांना देखील प्रशिक्षणासाठी या केंद्राचा मोठा उपयोग होईल, असेही यावेळी बोलतांना आदित्य ठाकरे यांनी सांगितले. याप्रसंगी खासदार अरविंद सावंत, आमदार सुनील शिंदे, माजी मंत्री सचिन अहिर, बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष आशिष चेंबूरकर, प्रख्यात नेमबाज तथा महाराष्ट्र रायफल असोसिएशनचे अध्यक्ष अशोक पंडित, महासचिव शीला कानुनगो, जी/दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

महेश बोभाटे मनोरंजन उद्यानाचे सुशोभीकरण

जी/दक्षिण विभागातील लोअर परळमध्ये पांडुरंग बुधकर मार्गावर कै. महेश मधुकर बोभाटे मनोरंजन उद्यानाचे सुशोभीकरण देखील महानगरपालिकेने केले आहे. त्याचे लोकार्पण देखील पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी केले. याठिकाणी सुमारे २८ मीटर x २५ मीटर क्षेत्रफळाच्या जागेत क्रीडा केंद्रदेखील विकसित करण्यात आले आहे. त्यासोबत उद्यानात फेरफटका मारण्यासाठी सुशोभित मार्ग, भिंतीवर आकर्षक चित्रांसह रंगरंगोटी, विद्युत रोषणाई आणि सुशोभित दिवे अशा वैशिष्ट्यांसह या मनोरंजन उद्यानाचे देखणे सुशोभीकरण करण्यात आले आहे.

क्राऊन मिल प्लॉट येथे बहुक्रीडा केंद्र विकसित

त्याचप्रमाणे जी/दक्षिण विभागातीलच प्रभादेवी परिसरात गोखले रस्त्यावर क्राऊन मिल प्लॉट येथे बहुक्रीडा केंद्र विकसित करण्यात आले आहे. त्याचे लोकार्पण पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. याप्रसंगी माजी नगरसेवक समाधान सरवणकर व इतर मान्यवर देखील उपस्थित होते. सुमारे २८.२५ मीटर x १४.३४ मीटर क्षेत्रफळाच्या या जागेत लॉन टेनिस, व्हॉलीबॉल, कबड्डी अशा खेळांसाठी सुविधा देण्यात आली आहे. त्यासोबत सुशोभित भिंती, सुशोभित विद्युत योजनाही करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.