ऐन गणेशोत्सवाच्या सणामध्ये महापालिकेच्या सुमारे ४१ हजार कामगार, कर्मचारी व अधिकाऱ्यांचे वेतन बायोमेट्रिक हजेरीच्या तांत्रिक चुकीमुळे कापले गेले. मात्र, याबाबत म्युनिसिपल कामगार संघटना आक्रमक होताच पगाराची कापलेली रक्कम आगामी म्हणजे सप्टेंबर महिन्यात देण्यात येणाऱ्या पगारात जमा करून दिले जाईल, असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त आशिष कुमार सिंह यांनी म्युनिसिपल मजदूर युनियनच्या शिष्टमंडळाला दिले आहे. त्यामुळे मुंबई म.न.पा. कामगार-कर्मचाऱ्यांचा मोठा विजय मानला जात आहे.
(हेही वाचा – गौतम अदानी जगातील पहिल्या 3 श्रीमंतांमध्ये स्थान मिळवणारे पहिले आशियाई)
सणाच्यावेळी हजारो कामगारांचे पगार हे शुन्य
महानगरपालिकेच्या विविध खात्यांमध्ये तसेच विभागांमध्ये दर दिवसाची हजेरी घेण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांच्या बायोमॅट्रीक हजेरी मशिन घेतल्या गेल्या. २० कामगारांच्या मागे १ मशिन देण्याचे पालिका प्रशासनाने ठरविले होते. तसे आदेशही प्रशासनाने काढले. परंतू आजच्या घडीला काही हजेरी ठिकाणांवर (चौंकीवर) ७०-८० कामगारांसाठी फक्त १ मशिन उपलब्ध आहे. पण ती मशिनही बंद पडली. तर कामगारांना दूरवर असलेल्या मशिनकडे पळावे लागत आहे. बायोमॅट्रीक मशिनवर हजेरी नोंदवण्यासाठी जाणाऱ्या कामगार, कर्मचारी गेल्यास हमखास इंटरनेट सेवा नसल्याने, मागील ३ वर्षांमध्ये जवळपास २५ लाख एएनएम झाले आहेत. याचाच अर्थ कामगारांनी सेवा बजावल्यानंतरही इंटरनेट सुविधा अभावी हजेरी न नोंदवली गेल्याने त्यांचे खाडे नोंदवले गेले आहे. त्यामुळे प्रत्येक कामगारांचे २०-२५ हजार रुपये कापले गेले आहेत. त्यामुळे ऐन गणपती सणाच्यावेळी हजारो कामगारांचे पगार हे शुन्य रुपये आलेले आहेत. पगार न आल्याने कामगारांच्या मनामध्ये फारच असंतोष पसरला होता.
तर बायोमॅट्रीक हजेरी राज्य सरकार कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनाशी जोडू नये
या पार्श्वभूमीवर महापालिकेतील कामगार संघटनांच्या वतीने सोमवार २९ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ४ वाजता महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (शहर) आशिष कुमार शर्मा, महापालिका सह-आयुक्त (सा.प्र.) मिलिन सावंत व मानव संसाधनचे ओएसडी कवेस्कर यांच्या सोबत समन्वय समितीच्या नेत्यांबरोबर सभा घेण्यात आली. या बैठकीमध्ये गणेशोत्सव सणामध्ये कामगार, कर्मचाऱ्यांचे कापलेले पगार आणि बायोमेट्रिक हजेरी प्रणालीच्या त्रुटीमुळे कामगार, कर्मचाऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान याबाबत प्रभावीपणे बाजू मांडण्यात आली. या बैठकीत जोपर्यंत १०० टक्के बायोमॅट्रीक हजेरी मशिन सक्षमपणे कार्यरत रहाणार नाही, तोपर्यंत एकाही कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांचे पगार कापले जाऊ नयेत. जर का बायोमॅट्रीक हजेरी सुरू ठेवायचीच असेल तर या बायोमॅट्रीक हजेरी महाराष्ट्र राज्य सरकार कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनाशी जोडू नये अशी मागणी करण्यात आली.
या बैठकीत कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांना कापलेले वेतन १ सप्टेंबर २०२२ तारखेपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात पुन्हा जमा करण्यात येईल असे आश्वासन आशिष कुमार शर्मा, मिलिन सावंत आणि कवेस्कर यांनी विचारपूर्वक आणि चांगला निर्णय घेतल्यामुळे समन्वय समितीतर्फे त्यांचे आभार मानण्यात आले. यावेळी प्रशासनाबरोबर चर्चा करण्यासाठी समन्वय समितीच्या वतीने म्युनिसिपल मजदूर युनियनचे अशोक जाधव, प्रफुल्लता दळवी, म्युनिसिपल कामगार सेनेच्या रचना अग्रवाल, संजय वाघ, संजीवन पवार व राठोड यांनी प्रशासनाबरोबर चर्चा केली. त्यावेळी म्युनिसिपल मजदूर युनियनचे अॅड्. जगन्नाथ लिंगम, शैलेंद्र खानविलकर, ऍड. योगेश नाईक, अरूण नाईक आणि संघटनेचे उपाध्यक्ष उपस्थित होते.
काय दिला होता इशारा
दरम्यान, दि म्युनिसिपल युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी सोमवारी आयुक्त व प्रशासक इक्बाल सिंह चहल यांना निवेदन देत, या गंभीर विषयाबाबत स्वतः लक्ष घालून कपात केलेले वेतन गणेशोत्सवापूर्वी म्हणजेच, मंगळवार, दिनांक ३० ऑगस्ट २०२२ रोजी देण्याबाबत उचित आणि त्वरित कार्यवाही करावी, अन्यथा संबंधित कामगार, कर्मचारी महापालिका मुख्यालयात गणेशोत्सव साजरा करतील आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या सर्व परिस्थितीत प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा दिला होता.
Join Our WhatsApp Community