व्हायरल व्हिडिओवरुन मुंबई महापालिकेची बदनामी, एकावर गुन्हा दाखल!

व्हायरल व्हिडिओवरुन सोशल मीडियावर मुंबई महापालिकेला जबाबदार धरुन, पालिकेची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी सुरेश नाखुवा याच्या विरुद्ध भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागील दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जिवंत व्यक्तीला मृत समजून, त्याला पूर्णपणे बंदिस्त अवस्थेत शववाहिनीतून बाहेर काढण्यात येत आहे. मात्र ती व्यक्ती जिवंत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. हा व्हिडिओ नक्की कुठला आहे किंवा तो शासनाला वेठीस धरण्यासाठी बनवण्यात आला आहे, हे सांगता येत नाही.

महापालिकेची बदनामी

मात्र, या व्हायरल झालेल्या व्हिडिओची खात्री न करता घाटकोपर येथे राहणाऱ्या सुरेश नाखुवा या इसमाने हा व्हिडिओ व्हायरल करुन, मुंबई महानगरपालिकेला दोष देत त्यांना जवाबदार धरुन सोशल मीडियावर व्हायरल केला. मात्र या व्हिडिओशी मुंबई महापालिकेचा कुठलाही संबंध नसल्यामुळे, मुंबई महानगर पालिकेची बदनामी सोशल मीडियावर केल्याप्रकरणी भोईवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

पोलिसांनी सुरेश नाखुवा या व्यक्तीचा शोध घेऊन त्याला नोटीस पाठवल्यानंतर, त्याने सोशल मीडियावर त्याच्याकडून झालेल्या चुकीची माफी मागितली आहे. दरम्यान गुरुवारी भोईवाडा पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here