दादांच्या जवळच्या मंत्र्याला वाचवण्यासाठी काळेंची बदली! काँग्रेसमध्ये कमालीची नाराजी!

रेमडेसिवीर प्रकरणी वादावर पडदा टाकण्यासाठी ठाकरे सरकारने एफडीए कमिशनर पदावरून अभिमन्यू काळे यांची उचलबांगडी केली.  

86

रेमडेसिवीर इंजेक्शनवरुन राज्यात कोरोना काळात राजकारण रंगले असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सर्वात जवळचे मंत्री आणि राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे मंत्री राजेंद्र शिंगणे अडचणीत सापडले होते. मात्र या सर्वांवर पडदा टाकण्यासाठी ठाकरे सरकारने एफडीए कमिशनर पदावरून अभिमन्यू काळे यांची उचलबांगडी केली. आता यावरून काँग्रेसचे मंत्री नाराज झाले असून, मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या ‘त्या’ कोणत्या नेत्याच्या दबावाखाली येऊन काळेंची बदली केली, असा एक सूर काँग्रेसच्या मंत्र्यांमध्ये उमटू लागला आहे. काँग्रेसच्या एका मंत्र्याशी खासगीत बोलले असता ‘हे न पटणारे असून, मुख्यमंत्र्यांनी असे चुकीचे पायंडे पाडू नये’. असे या मंत्र्याने सांगितले. तसेच राष्ट्रवादीच्या दबावात येऊन असे कोणतेही निर्णय घेऊ नये, असे या मंत्र्याने सांगितले.

महाराष्ट्र अडचणीत असताना स्वत:च्या परीने महाराष्ट्राला मदत केली नाही. उलट संभ्रमाचे वातावरण निर्माण केले. अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनाही मी कारवाईबाबत सांगितले आणि त्यांनी होकार दिला. मुजोर अधिकाऱ्यांना बाजूला करणे योग्यच आहे. – जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण मंत्री

आधीच काँग्रेस राष्ट्रवादीमुळे नाराज?

महाविकास आघाडीमध्ये असूनही फारसे महत्व नसलेली काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीच्या सरकारमधील हस्तक्षेपामुळे नाराज आहे. अनेक निर्णय हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावामुळे घेतले जातात असा आरोप काँग्रेसच्या मंत्र्यांकडून सातत्याने होत आला आहे. काही महिन्यांपूर्वी काँग्रेसच्या आमदारांना निधी दिला जात नाही यावरून देखील वाद निर्माण झाला होता. मात्र आता अधिकाऱ्यांच्या बदलीवरून काँग्रेस नाराज असल्याचे बोलले जात आहे.

(हेही वाचा : आधीच ऑक्सिजन नाही, त्यात आहे त्याची गळतीही सुरू झाली… नाशिकच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार!)

म्हणून अभिमन्यू काळेंची बदली!

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे मंत्री आणि विशेषतः शरद पवार आणि अजित पवार यांच्या मर्जीतले नेते अडचणीत सापडत आहेत. शरद पवार यांच्या जवळ असलेल्या अनिल देशमुख यांना नुकताच माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यामुळे राजीनामा द्यावा लागला होता. त्यातच आता रेमडेसिवीरवरून राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे हे अडचणीत येण्याची शक्यता होती. मात्र अभिमन्यू काळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांच्या जागी परिमल सिंग यांच्याकडे आयुक्त पदाची सूत्रे देण्यात आली आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन्स प्रकरणी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतल्याचे बोलले जात होते. मात्र आता यावरून काँग्रेस नाराज झाली आहे.


अधिकारी अभिमन्यू काळेंची बदली म्हणजे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली केली, तसाच हा प्रकार आहे. स्वतःची पापे आणि अपयश लपवण्यासाठी अधिकाऱ्यांच्या माथ्यावर मारायचे. आपण स्वच्छ आणि अधिकाऱ्यांकडूनच सर्व चुका झाल्या, अशी भूमिका या सरकारची गेल्या वर्षभरापासून आहे.
– प्रसाद लाड, भाजप आमदार

शिंगणेंना ‘दादां’नी झापले?

भाजपकडून राज्य सरकारसाठी रेमडेसिवीरचा साठा उपलब्ध करून दिला जाणार आहे. याबद्दलची कल्पना मला होती. रेमडेसिवीरचे उत्पादन करणाऱ्या कंपनीचे प्रतिनिधी आणि भाजपचे नेतेमंडळी यांची माझ्याच घरी बैठक झाली होती. त्यांनी महाराष्ट्र सरकारला रेमडेसिवीरचा साठा उपलब्ध करून देण्यास तयारी दाखवली होती आणि मी त्या गोष्टीवर सहमती दर्शवली होती, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली. त्यानंतर चक्क राष्ट्रवादीच्या मंत्र्याने सरकारला अडचणीत आणल्याचे समोर आले होते. मात्र यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणी राजेंद्र शिंगणे यांना झापल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर चक्क काल रात्री त्यांनी ट्विटर करत शिंगणे यांनी घूमजाव केला. भाजप रेमडेसिवीर विकत घेऊन मला देणार होते, अशी उलट सुलट चर्चा समाजमाध्यमांवर सुरू असून ते सपशेल चुकीचे आहे. कुठल्याही पक्षाला रेमडेसिवीर वैयक्तीकरित्या विकता येत नाही किंवा वाटता येत नाही, ते त्यांना सरकारलाच द्यावे लागतील, असे डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.