राज्य सरकारने तत्काळ आदिवासी पदभरती करावी या प्रमुख मागणीसह, अशाच अनेक मागण्यांसाठी अमरावती जिल्ह्यातील शेकडो आदिवासी विद्यार्थ्यांनी अमरावतीच्या गर्ल्स हायस्कूल चौक परिसरात साखळी उपोषण सुरू केले आहे. दरम्यान उपोषनाची शासनाने कुठलीही दखल न घेतल्याने संतप्त आदिवासी विद्यार्थ्यांनी आज आपल्या पदवी प्रमाणपत्राच्या प्रातिनिधिक प्रति जाळून राज्य सरकारचा निषेध केला.
( हेही वाचा : रविवारी बाहेर पडताय? जाणून घ्या कोणत्या मार्गावर असणार मेगाब्लॉक )
गेल्या दोन वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयाच्या नोकरभरती निर्णयाची अजूनही अंमलबजावणी केली नाही . ज्यामुळे १२ हजार ५०० जागा या बोगस प्रमाणपत्र घेणाऱ्या नागरिकांनी बळकावून ठेवल्याचा आरोप आदिवासी विद्यार्थ्यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ६ जुलै २०१७ ला दिलेल्या आदेशाचा अवमान केला जात आहे. त्यामुळे खऱ्या आदिवासी युवा शिक्षितवर्गाचे नुकसान होत आहे.
बेमुदत उपोषण
राज्यातील १२ हजार ५०० आदिवासींची रिक्त पदे तत्काळ भरावीत, अमरावती शहरात स्पर्धा परीक्षांसाठी राज्यातील १२ हजार ५०० जागांवर आदिवासींची पदे तत्काळ भरा योजना लागू करण्यात यावी, सन २०२०-२१ या काळातील आदिवासी विद्यार्थ्यांची डीबीटी तात्काळ द्यावी, अमरावती येथील आदिवासी मुला-मुलींच्या वस्तीगृहाची कामे तत्काळ पूर्ण करा अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे. या मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले असून अर्जुन युवनाते, जगदेव इवने, रोहित झाकर्डे, अजय ढंगारे, विठ्ठल खंदारे, रामेश्वर तोटा, वैभव लोखंडे, पुजा ठाकरे, गायत्री धांडे सविता वाघमारे, नेहा वाघमारे, राजेश कास्देकर, नंदकिशोर कास्देकर असे शेकडो विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community