स्टॅण्डअप कॉमेडियन वीर दास विरोधात वाढता असंतोष! काय आहे प्रकरण?

स्टॅण्डअप कॉमेडियन वीर दास याने त्याच्या युट्युब चॅनलवर छोटी चित्रफीत प्रसारित केली. त्यामध्ये त्याने भारताविषयी आक्षेपार्ह विधान केले. त्यामुळे याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. या प्रकरणी त्याच्या विरोधात दिल्ली आणि मुंबईत अनेक ठिकाणी तक्रारी दाखल होत आहेत. तसेच त्याच्या विरोधात सोशल मीडियातही असंतोष वाढू लागला आहे.

देशाची बदनामी केल्याचा आरोप 

या प्रकरणी दिल्ली भाजपचे प्रवक्ते आदित्य झा आणि मुंबईतील वकील आशुतोष जे. दुबे यांनी दास याच्याविरोधात तक्रार दाखल केली. दास याने देशाची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर जाणीवपूर्वक बदनामीकारक विधाने केली आहेत, असा झा यांनी आरोप केला आहे. तर दुबे यांनी दास याला अमेरिकेमध्ये भारताची प्रतिमा बदनाम आणि खराब करण्यासाठी जबाबदार धरले आहे. असे असले तरी दास याच्याविरोधात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

(हेही वाचा गोपीचंद पडळकरांच्या जीवाला धोका! फडणवीसांचे सरकारला पत्र)

दासच्या पाठीशी काँग्रेसचे नेते 

दास याच्या विरोधात देशभर असंतोष पसरला असताना काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र दास याचे समर्थन केले आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल, शशी थरुर यांच्यासह तृणमूल काँग्रेसचे नेते आणि खासदार महुआ मोईत्रा यांनी दास याचे समर्थन केले आहे. यावर कपिल सिब्बल यांनी म्हटले की, येथे ‘दोन भारत’ आहेत, परंतु त्याबद्दल जगाला सांगावे असे लोकांना वाटत नाही. कारण ‘आम्ही असहिष्णू आणि दांभिक आहोत.’

दास वर कडक कारवाई करा – कंगणा राणावत 

या प्रकरणी अभिनेत्री कंगणा राणावत हीने तिच्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे दास याच्यावर कडक कारवाईची मागणी केली आहे. जेव्हा तुम्ही सर्व भारतीय पुरुषांचा सामूहिक बलात्कार करणारे म्हणून उल्लेख करता तेव्हा ते जगभरातील भारतीयांविरुद्ध वर्णद्वेष आणि गुंडगिरीला चालना आणि प्रोत्साहन देते…हा दहशतवादच आहे. अशांवर कठोर कारवाई व्हायला हवी, असे कंगणा राणावत म्हणाली.

काय म्हणाला होता दास? 

सोमवारी वीर दास याने यूटय़ूबवर ‘आय कम फ्राम टू इंडिया’ नावाची चित्रफीत प्रसारित केली होती. यामध्ये त्याने ‘मी तिथून आलो आहे, जिथे दिवसा महिलांची पूजा केली जाते आणि रात्री बलात्कार केला जातो’, असे आक्षेपार्ह विधान केले होते. याशिवाय कोरोना महामारी, बलात्काराच्या घटना आणि विनोदी कलाकारांवर केली जाणारी कारवाई यांसह, शेतकरी निदर्शने या मुद्यांचाही त्याने उल्लेख केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here