दिल्लीतील दारू घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी पुन्हा एकदा छापेमारी सुरू केली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिल्लीसह हैदराबाद, पंजाबमध्ये 35 ठिकाणी छापे टाकले आहेत. यापूर्वी देखील ईडी आणि सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घराची आणि बँक लॉकरची झडती घेतली होती. तसेच विजय नायर आणि समीर महेंद्रू यांना दारू घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
यासंदर्भातील माहितीनुसार, केंद्रीय तपास यंत्रणेला दिल्लीतील दारू घोटाळ्याचे आंध्र प्रदेश आणि पंजाबशीही संबंध असल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे आता त्या ठिकाणीही छापे टाकून पुरावे शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. समीर महेंद्रूच्या चौकशीत अनेक महत्त्वाची माहिती हाती लागल्याचे बोलले जात आहे. राजकारणाशी संबंधित काही लोक, दारू व्यावसायिक आणि माजी अधिकाऱ्यांच्या घरांवर छापे टाकण्यात येत आहेत. एलजीच्या तक्रारीनंतर सीबीआयने दिल्लीतील मद्य धोरणातील घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ईडीनेही याप्रकरणी तपास सुरू केला होता. या प्रकरणात तपास यंत्रणांनी मनीष सिसोदिया यांना मुख्य आरोपी बनवले आहे. तसेच सीबीआयने सिसोदिया यांच्या घरावर छापेमारी करत त्याच्या बँक लॉकरचीही झडती घेतली होती.
( हेही वाचा: “धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटालाच मिळणार”; शंभुराज देसाईंचा दावा )
केजरीवालांकडून सिसोदिया यांना क्लिनचिट
दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवार सकाळपासून सुरू झालेल्या ईडीच्या छाप्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. केजरीवाल यांनी स्वतःकडून मनीष सिसोदिया यांना क्लीन चिट देऊन टाकली आहे. यासंदर्भात ट्विट करत केजरीवाल म्हणाले की, मनीष सिसोदिया यांच्या विरोधात पुरावे शोधण्यासाठी 500 हून अधिक छापे, 3 महिन्यांपासून 300 हून अधिक सीबीआय/ ईडीचे अधिकारी 24 तास काम करत आहेत. परंतु, त्यानंतरही मनीष सिसोदिया यांच्या विरोधात काहीही सापडले नाही. कारण त्यांनी काहीच गैर केले नाही. गलिच्छ राजकारणासाठी अनेक अधिकाऱ्यांचा वेळ वाया जात आहे. अशा देशाची प्रगती कशी होणार ? असा सवाल केजरीवाल यांनी उपस्थित केला आहे.
Join Our WhatsApp Community