दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना झटका, १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने सोमवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. जैन यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आली असून त्यांच्या जामीन अर्जावर 14 जून रोजी सुनावणी होणार आहे.

30 मे रोजी अटक करून 9 जूनपर्यंत ईडी कोठडी

मनी लाँड्रिग प्रकरणी जैन यांना 30 मे रोजी अटक करून 9 जून पर्यंत ईडी कोठडी देण्यात आली होती. कोठडी संपण्याच्या शेवटच्या दिवशी ईडीने जैन यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. याप्रकरणी आज, सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान जैन यांचा वैद्यकीय अहवाल सादर करण्यात आला. ईडीने सांगितले की, जामीन याचिकेवर सुनावणीसाठी वेळ द्यावा जेणेकरुन ते उत्तर दाखल करू शकतील. ईडीने 14 जून रोजी उत्तर दाखल करणार असल्याचे सांगितले. जैन यांचे वकील एन. हरिहरन यांनी प्रकृतीच्या कारणास्तव जामीन अर्जावर लवकर सुनावणी घेण्याची मागणी केली.

(हेही वाचा – आमदारांना घोडा म्हणणं, हा गाढवपणा! भाजपच्या अनिल बोडेंचा राऊतांवर हल्लाबोल)

ईडीच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितले की, रोख रक्कम दिल्लीत देण्यात आली होती. ही रोकड हवालाद्वारे कोलकाता येथील एंट्री ऑपरेटर्सपर्यंत पोहोचली. हे एंट्री ऑपरेटर शेअर्स खरेदी करून कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायचे. या सर्व बनावट कंपन्या होत्या. या बनावट कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून काळा पैसा पांढरा केला जात होता. पैसे देऊन प्रयत्न नावाच्या स्वयंसेवकी संस्थेमार्फत जमीन खरेदी करण्यात आली होती. ईडीने सत्येंद्र जैन यांना 2015-17मध्ये झालेल्या या व्यवहाराबद्दल चौकशीसाठी बोलावले होते. परंतु, जैन यांनी तपासात कुठलेही सहकार्य केले नसल्याचे मेहता यांनी न्यायालयाला सांगितले. हे पैसे दुसऱ्याचे आहेत की नाही, या पैशाचा फायदा कुणाला झाला हे शोधायचे आहे, असे मेहता सांगितले. तसेच हे प्रकरण केवळ 4.81 कोटी रुपयांचे नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

मंत्री झाल्यानंतर जैन यांनी सर्व कंपन्यांचा दिला राजीनामा

जैन यांचे वकिल एन. हरिहरन यांनी न्यायालयाला सांगितले की, 2017 पासून या प्रकरणात काहीच प्रगती झालेली नाही. यापूर्वी सत्येंद्र जैन 5 ते 6 वेळा तपासात सहभागी झाले होते. सहआरोपी काहीही बोलत असतील त्याला आरोपी जबाबदार नाहीत. तसेच सीबीआयच्या तपासातही उत्पन्नाचा स्त्रोत कळू शकला नाही. आरोपीचे पैसे हवालाच्या माध्यमातून हस्तांतरित झाल्याचा पुरावा नाही. सत्येंद्र जैन यांच्या घरावर दोनदा छापे टाकण्यात आले. त्यांचे बँक खाते जप्त करण्यात आले. मंत्री झाल्यानंतर जैन यांनी सर्व कंपन्यांचा राजीनामा दिल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here