लग्नाचं आमिष दाखवून अनेकदा महिलांची फसवणूक करण्यात आल्याच्या अनेक घटना आजवर घडल्या आहेत. पण आता याचबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. लग्नाचे खरे वचन देऊन शारीरिक संबंध ठेवण्यात आले, तर अशा शारीरिक संबंधांना बलात्कार म्हणता येणार नाही ,असे उच्च न्यायालयाने बलात्काराशी संबंधित एका खटल्यातील निर्णयात म्हटले आहे.
काय आहे न्यायालयाचा निकाल?
लग्नाचे खरे वचन देऊन काही कारणास्तव लग्न होऊ शकले नाही तर अशावेळी ठेवण्यात आलेल्या शारीरिक संबंधांना बलात्कार म्हणता येणार नाही. अशाच एका प्रकरणात प्राथमिक न्यायालयाने दिलेला निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांनी बाजूला ठेवला आहे. तक्रारदाराने सांगितल्यानुसार, त्या वक्तीने मुलीच्या पालकांना तीन महिने लग्नाला परवानगी देण्यासाठी सांगितले होते. तसेच या काळात त्या दोघांमधील शारीरिक संबंध हे दोघांच्या संमतीने झाले होते, असे न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे.
(हेही वाचाः लग्न म्हणजे तु्म्हाला क्रुरता करायला दिलेली सूट नव्हे..उच्च न्यायालय!)
हेतू खोटा नव्हता
कुटुंबीयांच्या साक्षीने दोघांचाही साखरपुडा झाला होता. यावरुन याचिकाकर्त्याचा आरोपीशी लग्न करण्याचा हेतू हा खरा होता. त्यामुळे नाते तुटले म्हणजे याचिकाकर्त्याचा आरोपीशी लग्न न करण्याचा हेतू नव्हता असे म्हणता येणार नाही, असे न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे. आपले महिलेवर प्रेम होते, तसेच तिच्याशी लग्न करुन संसार थाटण्याचे मी ठरवले होते, पण काही अटींमुळे हे नाते संपुष्टात आल्याचे न्यायालयात आरोपीने सांगितले. याची सत्यता पडताळून न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. लग्नाचे खोटे वचन आणि लग्न करण्याच्या वचनाचा भंग, या दोन्ही गोष्टींत फरक असल्याचे देखील दिल्ली उच्च न्यायालयाने यावेळी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community