ऐतिहासिक निर्णय! आईच्या जातीवर मिळाले जात प्रमाणपत्र

दिल्लीमध्ये पहिल्यांदाच आईच्या ओळखपत्रावर मुलाला जात प्रमाणपत्र देण्यात आले आहे. अनुसूचित जातीतील एका आईच्या मुलाला आठ वर्षांच्या संघर्षानंतर हे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. आईच्या जात प्रमाणपत्रावर आधारित मुलाला जात प्रमाणपत्र मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले.

अनेकांना याचा फायदा होईल

उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले की, करोलबागचे आमदार विशेष रवी यांच्या मध्यस्थीमुळे हा बदल शक्य झाला आहे. रवी यांनी एक वर्षाहून अधिक काळ या प्रकरणाचा जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला, तसेच दिल्ली विधानसभेतही हा मुद्दा उपस्थित केला. त्यांच्या सततच्या या प्रयत्नांमुळे गीता देवी यांच्या मुलाला आपल्या आईच्या जात प्रमाणपत्रावर आधारित अनुसूचित जात प्रमाणपत्र मिळाले. केवळ हे एकच प्रकरण नाही, तर त्यांच्यासारख्या हजारो लोकांना याचा फायदा होईल, असे सिसोदिया यावेळी म्हणाले.

( हेही वाचा: मुंबई-पुण्‍यातील विद्यापीठांचे जेएनयू करायचे आहे काय? )

…म्हणून घेण्यात आला निर्णय

यापूर्वी एससी, एसटी जात प्रमाणपत्रे ही केवळ वडिलांच्याच जात प्रमाणपत्रावर दिली जात होती. यामुळे ज्या महिलांचा घटस्फोट झाला आहे किंवा ज्या सिंगल महिलांनी मुलं दत्तक घेतले आहे, अशा महिलांना आपल्या मुलांसाठी लागणारे जात प्रमाणपत्र काढता येत नव्हते. त्यामुळे अशा महिलांच्या मुलांचे शिष्यवृत्तीसारख्या बाबींमध्ये नुकसान होऊ नये, म्हणून आता दिल्ली सरकारकडून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

याआधीही देण्यात आलायं असा निर्णय

याआधीही महाराष्ट्र सरकारने असा ऐतिहासिक निर्णय दिला आहे. 2019 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने नागपुरातील आंचलला तिच्या आईच्या जातीचे जात प्रमाणपत्र दिलं होतं. मला माझ्या आईनेच सांभाळले, मी माझ्या वडिलांना पाहिलेच नाही. त्यामुळे मला आईच्या नावानेच जात प्रमाणपत्र मिळावे, यासाठी नागपुरातील आंचल हिने पुकारलेल्या लढ्याला उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आईच्या नावाने जात प्रमाणपत्रही प्राप्त झाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here