दहशतवाद्यांचा कट : मुंबई रेल्वे स्थानकांची केलेली रेकी! गृहमंत्र्यांची उच्च स्तरीय बैठक

152

दिल्ली पोलिसांनी उधळवून लावलेल्या दहशतवाद्यांच्या कटानंतर राज्य सरकार आता ऍक्शन मोड आले आहे. कारण अटक करण्यात आलेल्या ६ दहशतवाद्यांपैकी एक जान महमंद शेख हा दहशतवादी मुंबईतील सायन येथे राहणार आहे. या दहशतवाद्यांनी मुंबई लोकल रेल्वे स्थानकांची रेकी केल्याची माहिती उघड झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पोलिसांच्या उच्च पदस्थांची बैठक बोलावली आहे.

मंत्रिमंडळ बैठकीच्या आधी गृहमंत्र्यांची बैठक 

गृहमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीत मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे आणि दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख विनीत अग्रवाल उपस्थिती राहणार आहेत. मंगळवारी जेव्हा दिल्ली पोलिस थेट जान महंमद शेख याचा धारावी येथील घरावर धाड टाकली आणि पुरावे ताब्यात घेतले. त्यानंतर लागलीच मुंबई पोलिसही सक्रिय झाले, त्यांनीही जान महंमद शेखच्या कुटुंबीयांची रात्री उशिरापर्यंत चौकशी केली. बुधवारी धारावी पोलिसांनी पुन्हा एकदा जान महंमद शेखच्या कुटुंबियांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर बुधवारी राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीच्या आधी गृहमंत्री वळसे-पाटील यांनी मुंबई पोलिसांच्या उच्च स्थरीय बैठक बोलावली आहे.

(हेही वाचा : दहशतवादी जान महंमदचे कुटुंबीय ताब्यात! रात्री उशिरापर्यंत कसून तपासणी)

रेल्वे पोलिस अधिकाऱ्यांचीही बैठक! 

दुसरीकडे रेल्वे पोलिसांच्या उच्च पदस्थांचीही बुधवारी तातडीने बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत मुंबईतील सर्व उपनगरीय रेल्वे स्थानकांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात येणार आहे. मुंबई रेल्वे आयुक्त कैसर खालिद यांच्यासह अन्य उच्च पदस्थ या बैठकीत राहणार आहेत. दशतवाद्यांनी मुंबई लोकलची रेकी केली होती.

दहशतवाद्यांना कोणते प्रशिक्षण मिळालेले? 

या दहशतवाद्यांना बॉम्ब कसा पेरायचा, शस्त्राशिवाय एखाद्याचा खून कसा करायचा, गर्दीच्या ठिकाणी कुणाला शंका आल्यास कसे लपायचे, एके-४७ मशीन गन चालवणे, चिनी बनावटीचे पिस्तूल चालवणे इत्यादींचे प्रशिक्षण पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआयच्या अधिकाऱ्यांनी दिले होते, अशी माहिती मिळत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.