जॅकलीनला दिल्ली पोलिसांकडून समन्स; 14 सप्टेंबरला हजर राहण्याचे निर्देश

सुकेश चंद्रशेखरशी संबंधित 215 कोटींच्या खंडणी प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून, या आरोपपत्रात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या नावाचाही समावेश करण्यात आला होता. त्यामुळे जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ झाली होती. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी ईडीकडून दिल्ली न्यायालयात मनी लॉंड्रिंग अंतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. आता दिल्ली पोलिसांकडून जॅकलीनला मनी लाँड्रिंग प्रकरणी समन्स बजावण्यात आला आहे. यानुसार 14 सप्टेंबरला जॅकलीनला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

(हेही वाचा – लम्पी आजारापासून पशुधन वाचविण्यासाठी तातडीने पावले उचला; मुख्यमंत्र्यांचे निर्देश)

जॅकलीनला यापूर्वीही 12 सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते. पण काही कारणांमुळे जॅकलीन आज न्यायालयात जाऊ शकली नाही. त्यामुळे तिला आता 14 सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे समन्स पोलिसांनी दिले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी जॅकलिन फर्नांडिसचे सुकेश चंद्रशेखरसोबतचे कनेक्शन समोर आल्यापासून ती कायदेशीर अडचणीत सापडली आहे. सुकेश चंद्रशेखर प्रकरणात जॅकलिनची याआधीही अनेक वेळा चौकशी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुकेशने जॅकलिनला साधारण 10 कोटी रुपयांच्या भेटवस्तू पाठल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे.

कोण आहे सुकेश चंद्रशेखर

मिळालेल्या माहितीनुसार, सुकेशवर वेगवेगळ्या राज्यात जवळपास 32 गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध सीबीआय, ईडी आणि आयकर तपास सुरू आहेत. सुकेश चंद्रशेखरवर प्रभावशाली असल्याचे भासवून लोकांना फसवल्याचा आरोप आहे. मोठमोठ्या व्यक्तींसोबत फोटो दाखवून तो लोकांना फसवायचा आणि त्यांच्या कामासाठी सर्वाधिक पैसे घेत असे. त्याचप्रमाणे, त्याने दिल्लीतील एका व्यावसायिकाच्या पत्नीकडून 215 कोटी रुपये वसूल केले होते आणि त्याच्या ओळखीच्या आधारे आपण तिच्या पतीला जामीन मिळवून देऊ असे सांगितले होते. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, सुकेश तुरुंगातूनच फसवणुकीचे रॅकेट चालवत होता, अशीही माहिती मिळतेय.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here