स्वयंघोषित सर्पमित्राकडून पैशाची मागणी

विनापरवाना नागोबा पकडल्याबाबत तसेच नागोबाच्या तावडीतून सोडवण्यासाठी पैसे मागतल्याचे प्रकरण अहमदनगरमधील युवतीला आता चांगलंच भोवलंय. शीतल कसार असं या युवतीचं नाव असून, तिचा पैसे मागितल्याचा व्हायरल व्हिडिओ वनविभागाच्या हाती लागला असल्यानं तिला थेट तुरुंगात पोहोचवण्याची तयारी वनविभागाने केली आहे.

वनविभागाचा शोध

गुरुवारी शीतल कसारने कोब्रा नाग पकडल्याप्रकरणी संबंधितांकडून हजार रुपयांची मागणी करत असल्याचा व्हिडिओ साताऱ्याचे मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी पाहिला. साप पकडण्यासाठी चाळीस किलोमीटरहून दूर आल्याप्रकरणी पेट्रोल आणि कामाचा मोबदला म्हणून हजार रुपयांच्या मागणीसाठी चेहरा झाकलेली युवती ही शीतल कसार असल्याचा दावा भाटे यांनी केला. शीतल कसार या युवतीनं इन्स्टाग्राम या सोशल मिडिया माध्यमावरही साप व इतर सरपटणा-या प्राण्यांसह फोटो टाकल्याचं भाटे यांनी पाहिले. शीतलचा व्हायरल व्हिडिओ तसेच इन्स्टाग्रामवरील फोटो याबाबत कायदेशीर तक्रार केल्याचं भाटे यांनी सांगितले. या प्रकरणी शीतल आणि वनाधिका-यांशी झालेला वादही व्हायरल होत असल्याची माहिती भाटे यांनी दिली.

तुरुंगवासाची शिक्षा होणार

गुरुवारी व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शीतलने कोब्रा पकडला आहे. तर इन्स्टाग्रामवरील अकाऊंटवर शीतलनं सरडा आणि अजगर हाती पकडल्याचा फोटो पोस्ट केला आहे. हे तिन्ही सरपटणारे प्राणी बाळगल्याप्रकरणी वन्यजीव संरक्षण कायदा १९७२, वर्गवारी एक अंतर्गत गुन्हा ठरतो. पहिल्या वर्गवारीतील तरतुदीप्रमाणे शीतलवर तुरुंगवासाची शिक्षा होणार आहे.

( हेही वाचा : कुत्र्याला मारले म्हणून न्यायालयाने त्यांना कुत्र्यांची सेवा करण्याची दिली शिक्षा )

वन्यजीव संरक्षण कायदा १९७२

वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार, वन्यजीव हाताळण्याची परवानगी सामान्यांना नाही. वन्यजीवांच्या बचावाचे काम वनविभागाकडून केले जाते. या प्रकरणी एखाद्याला सरपटणारा प्राणी आढळला की, चोवीस तासांच्या आत वनविभागाच्या स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधून तो वनाधिका-यांना सोपवायचा असतो. या कामाला मदत करण्यासाठी वनविभाग कित्येकदा प्राणीप्रेमी संस्थांना पाठवते. काही प्राणीप्रेमी संस्था वनविभागाच्या देखरेखीखाली काम करतात. मात्र त्यांनाही चोवीस तासांच्या आत वन्यजीवांचा तपशील वनविभागाला द्यावा लागतो, अन्यथा बेकायदा वन्यजीव बाळगल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल होतात.

तज्ज्ञांचे मत

विनापरवाना वन्यजीव पकडणे तसेच लोकांकडून पैसे मागितल्याप्रकरणी कारवाई होणार आहे. सरपटणारा प्राणी विषारी असताना स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नका, असे आवाहन वनविभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी केले आहे. सापाचे आणि इतर सरपटणा-या प्राण्यांचा बचाव करणारे स्वयंघोषित सर्पमित्र पैशाच्या हव्यासापोटी हे काम करतात. कित्येकदा हे साप औषध कंपन्यांना विकले जातात, असे साताऱ्याचे मानद वन्यजीवरक्षक रोहन भाटे यांनी स्पष्ट केले. तर वन्यजीव पकडल्याचे फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करण्याची पद्धत बंद व्हायला हवी. वनविभागाशी संबंधित स्वयंसेवक असो वा प्राणीप्रेमी संस्था कारवाईचा बडगा उचलावा, असे सरपटणा-या प्राण्यांचे अभ्यासक वरद गिरी यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here