मुंबई महानगरपालिकेची रुग्णालये, आरोग्यकेंद्रे, विशेष रुग्णालये, प्रसूतिगृहे, दंत रुग्णालय, कान, नाक व घसा रुग्णालय यामध्ये वैद्यकीय उपचारासाठी येणाऱ्या ४० टक्क्यांहून अधिक अपंगत्व असलेल्या दिव्यांग व्यक्तींना मोफत व प्राधान्याने उपचार देण्याची मागणी होत आहे. शिवसेनेचे नगरसेवक सचिन पडवळ यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे ही मागणी केली आहे.
काय म्हटले सभागृहातील ठरावाच्या सूचनेत
मुंबई महापालिकेच्या सभागृहातील पडवळ यांनी केलेल्या या ठरावाच्या सुचनेमध्ये, बृहन्मुंबई महानगरपालिकेची रुग्णालये, आरोग्यकेंद्रे, विशेष रुग्णालये, प्रसूतिगृहे, दंत रुग्णालय, कान, नाक व घसा रुग्णालय यामध्ये मुंबईतील विविध ठिकाणांहून सामान्य नागरिकांबरोबरच दिव्यांग व्यक्तीदेखील उपचारार्थ येत असतात. दिव्यांग व्यक्ती या शारिरीक दुर्बलतेमुळे त्यांची कामे सहजरित्या करु शकत नाहीत. रुग्णालयांमध्ये बाह्यरुग्ण विभाग, उद्वाहन या ठिकाणी त्यांना सर्वसामान्यांबरोबरच रांगेत उभे राहावे लागते. शिवाय, त्यांची तीन व चार चाकी वाहने रुग्णालयाजवळच उभी करण्याची सुविधा उपलब्ध नसते.
(हेही वाचा – ‘एसटी’ संपकरी कर्मचाऱ्यांचे ‘लालपरी’साठीचं आंदोलन निष्फळ! आता पुढे काय…)
पालिकेने मदतीचा हात पुढे करणे गरजेचे
परिणामी, त्यांची खूपच गैरसोय होते. त्याचप्रमाणे, बिकट आर्थिक परिस्थितीमुळे बहुतांश दिव्यांग व्यक्तींना खाजगी रुग्णालयातील वैद्यकीय उपचाराकरिता येणारा खर्च परवडणारा नसतो. त्यामुळे अशा दिव्यांग व्यक्तींची शारिरीक व आर्थिक परिस्थिती लक्षात घेता, महानगरपालिकेने त्यांना मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे असे म्हटले आहे. त्यामुळे तीन मोफत उपचार देताना, बाह्यरुग्ण विभाग व उद्वाहन या ठिकाणी रांगेत प्राधान्य दिले जावे. तसेच त्यांची तीन व चार चाकी वाहने रुग्णालयाजवळच उभी करण्याची सुविधा दिली जावी अशीही सूचना केली आहे.
Join Our WhatsApp Community