नोकरीच्या बदल्यात शरीर सुखाची मागणी; समाजकल्याण अधिकाऱ्याची चौकशी 

अनुकंपा तत्वावर नोकरी मागणाऱ्या युवतीकडे लातूरमधील समाजकल्याण अधिकारी सुनील खमितकर यांनी थेट शरीर सुखाची मागणी करत त्या युवतीचा मानसिक छळ केला. 

वडिलांचा मृत्यू झाला म्हणून त्यांच्या जागेवर नोकरी द्या, अशी मागणी करणाऱ्या एका युवतीला ‘तुझ्याकडे पैसे नाहीत, घरची परिस्थिती वाईट आहे, मला देण्यासाठी काही नाही, तेव्हा तू मला एक रात्र दे, तुला नोकरी देतो’, असे म्हणणारे लातूरमधील समाजकल्याण अधिकारी सुनील खमितकर यांच्या विरोधात आता जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

युवतीची लेखी तक्रार, तर अधिकाऱ्याची युवतीच्या विरोधात पोलीस तक्रार!

संबंधित युवतीचे वडील लातूर संचालित मतीमंद विद्यालयात शिक्षक होते. ५ जुलै २००७ रोजी त्यांचे निधन झाले. त्यानंतर ३ महिन्यांनी युवतीच्या आईने अनुकंपा तत्त्वावर नोकरीसाठी अर्ज केला होता. मात्र आईला नोकरी दिली नाही. वडिलांचा मृत्यू होऊन १४ वर्षांचा वनवास झाला तरी नोकरी मिळाली नाही. २०१७पासून त्या युवतीने स्वतःला अनुकंपा तत्वावर नोकरी मिळावी म्हणून प्रयत्न सुरु केले. मात्र समाजकल्याणचे अधिकारी खमितकर यांनी कायम टोलवाटोलवी केली. त्यासाठी पैशाची मागणी केली. मात्र जेव्हा ती युवती पैसे देऊ शकत नाही, असे समजताच खमितकर यांनी त्या युवतीला ‘तुला मला देण्यासाठी पैसे नाहीत, घरची परिस्थिती वाईट आहे, तेव्हा तू मला एक दिवस आणि एक रात्र दे, त्या बदल्यात तुला नोकरी देतो’, अशी मागणी केली. त्यावर त्या युवतीने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली. मात्र त्यानंतर लगेचच खमितकर यांनी त्या युवतीच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली.

(हेही वाचा : अरे हे काय… पोलिसाला टीसीने पकडले?)

जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश!

परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी त्या युवतीची तक्रार आणि वृत्तपत्रातील बातम्या यांच्या आधारे या प्रकरणाची दखल घेत जिल्ह्यास्तरीय तक्रार निवारण समितीकडे सर्व कागदपत्रे पाठवली असून त्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. हा अहवाल आल्यावर कारवाई करू, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तसेच संबंधित युवतीच्या अनुकंपा तत्वावर आधारित नोकरीचे आदेश काढले असल्याचे सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here