‘आदिपुरुष’ची कथा रामायणावर आधारित आहे. चित्रपटात प्रभासने प्रभू श्री रामचंद्रांची भूमिका साकारली आहे, तर सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट हिंदी आणि तेलगू अशा दोन भाषांमध्ये बनवला जात आहे. १२ जानेवारी २०२३ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता प्रभास आणि सैफ अली खान स्टार असलेल्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटावरून सुरू असलेला वाद तीस हजारी न्यायालयात पोहोचला आहे. अधिवक्ता राज गौरव यांनी न्यायालयात याबाबत याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी आदिपुरुष चित्रपटातील आणि टीझरमधील आक्षेपार्ह भाग काढून टाकण्याबाबत युट्यूबसह इंटरनेट मीडियाला निर्देश देण्याची मागणी केली आहे. भगवान राम आणि हनुमान यांचे पात्र चुकीच्या पद्धतीने दाखवून हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा युक्तिवाद वकिलांनी केला आहे. याचिकाकर्त्याने चित्रपटावर कायमस्वरूपी बंदी घालण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली प्रतिवादी रामायण सारख्या महाकाव्याच्या मूळ स्वरुपात बदल होऊ शकत नाही. हा भारताच्या संस्कृतीचा, सभ्यतेचा आणि अध्यात्म आणि धर्माचा भाग असल्याचे ते म्हणाले. भगवान रामाची प्रतिमा शांत प्रिय आहे, परंतु चित्रपटाच्या टीझरमध्ये रामाची प्रतिमा एक अत्याचारी, सूडबुद्धी वागणारा तसेच रागीट व्यक्ती म्हणून चित्रित करण्यात आली आहे. चित्रपटातून हिंदू देवतेचे विडंबन होणे हा पहिला चित्रपट नाही, याआधी पीके,ओ माय गॉड, लाल सिंग चड्ढा, अशा चित्रपटांमधून हिंदू देवदेवतांचे विडंबन करण्यात आले आहे.
( हेही वाचा : राहुल गांधी सावरकरांना का घाबरतात?)
रामानंद सागर यांची रामायण मालिकाच आदर्श
‘आदिपुरुष’ या रामायणावर आधारित चित्रपटाचा १ मिनिट ४६ सेकंदाचा ‘टीझर’ चित्रपट निर्मात्यांकडून प्रसारित करण्यात आल्यावर संपूर्ण देशात गदारोळ निर्माण झाला आहे. यातून भारतीयांच्या रामायण आणि त्यातील चरित्रे यांच्याविषयीच्या भावना किती जागृत आहेत, हे लक्षात येते. रामायण आणि महाभारत हे भारतीय संस्कृतीचे दर्शक आहेत. यांच्या आधारेच भारतीय म्हणजे हिंदु ‘आपले जीवन आदर्श कसे असायला हवे’, याचा विचार करून आयुष्याचे मार्गक्रमण करत असतात. वर्ष १९८६ मध्ये रामानंद सागर यांनी दूरदर्शनवर ‘रामायण’ ही मालिका चालू केली आणि ती जगभरात प्रसिद्ध झाली. या मालिकेचे प्रसारण रविवारी सकाळी होत असे. तेव्हा संपूर्ण देश दूरचित्रवाणी संचासमोर बसून ते पहात. त्यात हिंदूंसमवेत मुसलमान आणि अन्य धर्मीय यांचा समावेश होता, हे नाकारता येणार नाही. याच वेळी देशातील सर्व रस्ते आणि वर्दळीची ठिकाणे निर्मनुष्य होत असत. एवढी लोकप्रियता या मालिकेला मिळाली होती. रामायण आणि महाभारत यांच्यातील प्रसंगांशी संबंधित अनेक चित्रपट देशातील विविध भाषांत त्यापूर्वी प्रदर्शित झाले होते. त्यात आणि या मालिकेत दाखवण्यात आलेल्या चरित्रांची वेशभूषा, वागणे, बोलणे हे जवळपास सारखे होते, म्हणजेच भारतीयांवर हाच संस्कार झाला होता अाणि ते तितकेच खरे आहे; कारण रामायणामध्येच त्यातील चरित्रांचे वर्णन करण्यात आलेले आहे आणि त्यानुसारच या चित्रपटांमध्ये दाखवण्यात आले. तसेच आतापर्यंत या चरित्रांची जी काही चित्रे आपण पाहिलेली आहेत, तीही त्यानुसारच रेखाटण्यात आलेली आहेत. मग अशा वेळी कुणीतरी त्यात विपरीत पालट करत असेल, तर ते कसे स्वीकारले जाणार? हा मूळ प्रश्न आहे; कारण ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या ‘टीझर’मध्ये श्री हनुमान आणि रावण यांना मिशी नसलेले, तर प्रभु श्रीरामांना मिशी असलेले दाखवण्यात आले आहे’, असे लोकांनी पाहिले. यामुळेच आदिपुरुष चित्रपटावरून देशात गदारोळ निर्माण झाला आहे.
विविध संघटनांकडून होतोय विरोध
‘आदिपुरुष’ चित्रपट ५०० कोटी रुपये खर्च करून बनवण्यात येत आहे. या ५०० कोटींमधील अर्धी रक्कम केवळ ‘स्पेशल इफेक्ट’साठीच खर्च करण्यात येणार आहे. सध्या हॉलिवूडमध्ये ज्या पद्धतीने चित्रपट बनवले जातात, त्याच धर्तीवर रामायणावर आधारित हा चित्रपट बनवला जात आहे. ज्यांनी टीझर पाहिला आहे, त्यांना पूर्वीचे म्हणजे रामानंद सागर यांचे रामायण आणि हा चित्रपट यांच्यात आकाश आणि पाताळ असा भेद लक्षात आला असणार. रावण राक्षस होता, हे जितके खरे आहे, तितकेच तो ब्राह्मण आणि वेदांचे ज्ञान असणारा होता. प्रभु श्रीरामांनी त्याचा वध केल्यानंतरही त्याचा योग्य मान ठेवला होता. रावणाच्या मृत्यूच्या क्षणी श्रीरामांनी लक्ष्मणाला रावणाकडून मार्गदर्शन घेण्यास पाठवले होते, हे सर्वांनाच ठाऊक आहे. नव्या पिढीचे, नव्या काळातील रामायण बनवण्याच्या विचारातून कुणी त्याला हवा तसा बदल करत असेल, तर ते धर्माभिमानी हिंदु कसे स्वीकारतील? आणि त्यांनी ते का म्हणून स्वीकारावे? भाजपचे आमदार राम कदम यांनी ‘महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही’, अशी घोषणा केली आहे, तसेच विश्व हिंदु परिषद आणि हिंदु महासभा यांनीही याला विरोध केलेला आहे. श्रीराम मंदिराचे प्रमुख पुजारी सत्येंद्र दास यांनीही याला विरोध केला आहे. मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनीही चित्रपटात बदल न केल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
Join Our WhatsApp Community