वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील आषाढी यात्रेसाठी नागपुरातून पाच दिवस पंढरपूर यात्रा स्पेशल गाड्या चालविण्यात याव्या अशी मागणी नागपूर जिल्ह्यातील रामटेकचे शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांनी केली आहे. याबाबत त्यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पत्र दिले आहे.
कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून पंढरपूर यात्रा मर्यादित स्वरूपात होती. आता कोरोना निर्बंध मागे घेण्यात आल्यावर राज्यभरातून असंख्य वारकरी यात्रेला जाणार आहेत. केवळ नागपूर जिल्ह्यातूनच नव्हे तर संपूर्ण विदर्भासह मध्यप्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा येथील भाविकही पंढरपूरसाठी नागपूरहून प्रवास करतात. पंढरपूर यात्रेसाठी नागपूरहून एक यात्रा स्पेशल गाडी चालविली जाते. भाविकांची संख्या पाहता ती अपुरी पडणार आहे. त्यामुळे भाविकांची सोय व्हावी यासाठी आषाढी एकादशीच्या पाच दिवस पूर्वीपासून पंढरपूरकडे जाणाऱ्या पाच गाड्या व परतीच्या प्रवासासाठी पंढरपूरहून नागपूरला येणाऱ्या पाच गाड्या सोडण्याची गरज आहे. ज्यामुळे भाविक प्रवाशांची मोठी सोय होईल असे, तुमाने यांनी स्पष्ट केले आहे.
मराठवाड्यातील प्रवाशांनाही होणार फायदा
यावर्षी 9 जुलै ते 13 जुलै या कालावधीत पंढरपूर यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रवाशांची संख्या पाहता 5 जुलै ते 9 जुलै दरम्यान नागपूर ते पंढरपूर 5 यात्रा स्पेशल व परतीसाठी 10 जुलै ते 14 जुलै या कालावधीत पंढरपूर ते नागपूर या 5 दिवस गाड्या चालवण्यात याव्यात. या गाड्यांचा फायदा विदर्भ, मराठवाडासह नजीकच्या राज्यातील भाविकांना होणार आहे. यासाठी 15 जूनपर्यंत वेळापत्रक जाहीर करावे अशीही मागणी खासदार तुमाने यांनी केली.
Join Our WhatsApp Community