VIP नंबरसाठी आता मोजावे लागणार पाच लाख रुपये !

आपल्या वाहनांवर व्हीआयपी नंबर असावेत ही क्रेझ असते. यातून परिवहन विभागाला महसूलही मिळतो. असा व्हीआयपी क्रमांक मिळावा म्हणून अतिरिक्त फी मोजण्यास तयार असणा-यांना हे व्हीआयपी स्टेटस टिकवण्यासाठी आणखी पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. व्हीआयपी नंबर शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव परिवहन विभागाने तयार केला असून, तसा प्रस्तावही सरकारकडे पाठवला आहे. यात चारचाकी गाड्यांच्या 0001 व्हीआयपी नंबर घेण्यासाठी शुल्क 3 लाखांवरुन पाच लाख प्रस्तावित आहे.

दुचाकी, कार, ट्रक, रिक्षा, टॅक्सी आदी वर्गवारीतील वाहनांसाठी व्हीआयपी क्रमांक मिळवण्याची सुविधा आहे. त्यासाठी जास्त पैसे मोजण्याची हौशी मंडळींची तयारी असते. या क्रमांकांवरील शुल्कापोटी परिवहन विभागाला वर्षाला कोट्यावधींचा महसूल मिळतो. राज्यातील सर्वच परिवहन केंद्रांवर व्हीआयपी क्रमांक उपलब्ध असतात. असे क्रमांक मिरवणा-यांची संख्या मुंबईत सर्वाधिक आहे. 1 या व्हीआयपी क्रमांकासाठी सर्वाधिक शुल्क आकारले जाते.

( हेही वाचा: दसरा मेळावा शिवतीर्थावरच, तयारीला लागा! महापालिकेच्या परवानगी आधीच उद्धव ठाकरे यांचा आदेश )

या क्रमांकांची सर्वाधिक मागणी 

कारसाठी 1 या व्हीआयपी क्रमांकासाठी 3 लाखांऐवजी 5 लाख, दुचाकी आणि तीनचाकींना 50 हजारांऐवजी 1 लाख रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तर मुंबई, मुंबई उपनगर , पुणे, ठाणे, रायगड, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर या ठिकाणी व्हीआयपी क्रमांकाची मागणी जास्त आहे. याठिकाणी 0001 क्रमांकासाठी 4 लाखांऐवजी 6 लाख शुल्क आकारण्याचा प्रस्ताव आहे. तर सिरीजमध्ये नसणा-या व्हीआयपी नंबरसाठी 18 लाख मोजावे लागणार आहेत. राज्यात 240 वेगवेगळे क्रमांक हे व्हीआयपी क्रमांकाच्या यादीत आहेत. 0001 नंतर 999, 111, 222, 333, 786 या क्रमांकाची जास्त विक्री होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here