तीन वर्षांपासून विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित! २६ जानेवारीला उपोषणाचा इशारा

217

तीन वर्ष होऊन आणि त्यासाठी वारंवार मागणी करून देखील केंद्राच्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक योजनेअंतर्गत मिळणारी शिष्यवृत्ती मिळाली नसल्याने विद्यार्थी आणि पालकावर चक्क उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे. कुडाळ हायस्कुलच्या हलगर्जीपणामुळे सहा मुले शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्याचा आरोप पालकांनी केला असून शिष्यवृत्ती मंजूर होऊनसुद्धा ती मुलांच्या खात्यात जमा झाली नसल्याने पालकांनी आज पत्रकार परिषद घेऊन २६ जानेवारीला उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.

वार्षिक १२ हजार शिष्यवृत्ती पुढे चार वर्ष मिळते

केंद्र सरकारच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल योजने अंतर्गत ज्या मुलांचे पालक शासकीय सेवेत नाहीत त्यांच्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. इयत्ता आठवीमध्ये ही परीक्षा होते आणि त्यात यशस्वी विद्यार्थ्यांना वार्षिक १२ हजार अशी शिष्यवृत्ती पुढे चार वर्ष मिळते. कुडाळ हायस्कूलच्या नेहा विजय प्रभू तेंडोलकर, निकिता विजय प्रभू तेंडोलकर, वीणा दत्ताराम गोलतकर, तन्वी गुरुनाथ सावंत, ऋग्वेद आशिष प्रभू आणि संस्कार दत्तात्रय उपाध्ये या विद्यार्थ्यांनी २०१८-१९ ही परीक्षा दिली होती आणि त्यांना ही शिष्यवृत्ती मिळाली होती, पण आज तीन वर्ष झाली तरी त्या मुलांच्या खात्यात एकही रुपया जमा झालेला नाही. अशी माहिती का मिळाली नाही, याबाबत त्यांनी संबंधित प्रशाला आणि शिक्षण विभागाशी संपर्क साधला असता या मुलांची ऑनलाईन नोंदणीचा झाली नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला. याला सर्वस्वी संबंधित प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

(हेही वाचा अखेर उत्पल पर्रीकर अपक्ष निवडणूक लढवणार…)

पालकांकडून संताप व्यक्त

शिष्यवृत्ती मिळण्यासाठी मुलांनी खूप मेहनत घेतलेली आहेत. अभ्यास केलेला आहे. मिळालेल्या शिष्यवृत्तीतून आपल्या शिक्षणाचा खर्च उचलून पालकांना काहीसा हातभार लावावा अशी स्वप्न या मुलांनी बघितली होती. पण तीन वर्ष होऊनसुद्धा वर्षाला १२ हजार प्रमाणे तीन वर्षाची ३६ हजार एवढी रक्कम या मुलांना शिष्यवृत्ती म्हणून मिळालेली नाही, त्याबद्दल मुलांनी नाराजी व्यक्त केली. इयत्ता आठवीत या मुलांनी परीक्षा दिली होती ती मुले आता बारावीत शिकताहेत पण त्यांना अजून शिष्यवृत्ती मिळालेली नाही. खरेतर केंद्र सरकारने मुलांना आणि पालकांना आर्थिक हातभार लागावा यासाठी ही एनएमएमएस शिष्यवृत्ती योजना सुरु केली. पण केवळ हायस्कुल प्रशासन आणि शिक्षण विभाग यांच्यात योग्य समानव्य नसल्याने मुलांना या शिष्यवृत्तीचा एकही पैसे मिळाला नसल्याबद्दल पालकांनी संताप व्यक्त केला.

चार वर्षाचे एकूण ४८ हजार रुपये मुलांना शिष्यवृत्ती मिळते

शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते. एक उमेद निर्माण होते. आठवी ते बारावी ही वर्ष मुलांच्या शैक्षणिक आयुष्यातली खूप महत्वाची वर्ष आहेत. त्यामुळे या काळात मिळणारी शिष्यवृत्ती खूप महत्वाची असते. थोडे थोडके नाहीत तर केंद्र सरकारच्या माध्यमातून चार वर्षाचे एकूण ४८ हजार रुपये मुलांना शिष्यवृत्ती मिळते. पण कोणाच्या तरी चुकीमुळे जर ही शिष्यवृत्ती मिळत नसेल तर संबंधित यंत्रणेने लक्ष घालून या मुलांना न्याय मिळवून देणे आवश्यक ठरते. यामुळे संबंधित यंत्रणांचे लक्ष वेधण्यासाठी मुलांच्या पालकांनी मुलांना सोबत घेऊन २६ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजल्यापासून कुडाळ हायस्कुल समोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.