पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या राज्यस्तरीय नेत्यांना एनआयए आणि ईडी या केंद्रीय तपास यंत्रणेने अटक केल्याच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या ६० ते ७० जणांवर पुणे पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईच्या निषेधार्थ या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. त्यासाठी या कार्यकर्त्यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर शुक्रवारी, २३ सप्टेंबर रोजी आंदोलन केले, तेव्हा या कार्यकर्त्यांनी भारतविरोधी घोषणा दिल्या. या प्रकरणी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, भारतात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना सोडणार नाही, असे सांगितले.
देशात अशांतता निर्माण करण्याचा इशारा
पीएफआयच्या आरोपींनी मोठमोठ्याने घोषणा देत रस्ता अडवला. त्यात पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबरचे नारे देण्यात आले. त्यामुळे खळबळ उडाली आहे. याविषयी बोलताना फडणवीस यांनी, पीएफआयकडून देशात अशांतता निर्माण करण्याचे षडयंत्र रचण्यात येत होते. त्यांच्यावरील कारवाईच्या विरोधात महाराष्ट्रात, भारतात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना सोडणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाई करु, घोषणा देणारे जिकडे असतील, तिकडे जाऊन त्यांना शोधून काढू, असा इशारा दिला. दरम्यान, एनआयए आणि अन्य केंद्रीय यंत्रणांनी धडाकेबाज कारवाई करत पीएफआय या संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांसह प्रमुखाच्या मुसक्या आवळल्या होत्या. या कारवाईला काही ठिकाणी विरोध होत आहे. पीएफआयवर करण्यात आलेल्या कारवाईमागे अनेक खास गोष्टी आहेत. सर्व ठिकाणांवर एकाच वेळी छापेमारी करण्यात आली होती.