आयपीएस अधिकारी तसेच परिमंडळ २ चे तत्कालीन पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांच्या नोकराला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. पप्पूकुमार गौड असे अटक करण्यात आलेल्या नोकराचे नाव असून त्याने त्रिपाठी यांनी पाठवलेली खंडणीची रक्कम हवाला मार्फत स्विकारली होती असा आरोप गौड याच्यावर आहे. खंडणी प्रकरणातील ही चौथी अटक असून यापूर्वी लो.टी. मार्ग पोलीस ठाण्याचे एपीआय, पीएसआय आणि पीआय यांना अटक करण्यात आलेली आहे. पोलीस उपायुक्त त्रिपाठी यांना पोलीस जंग जंग पछाडत आहे.
या प्रकरणी तिन्ही अधिकाऱ्यांना अटक
दक्षिण मुंबईतील काळबादेवी परिसरात अंगाडीया कुरिअर सर्व्हिस चालविणाऱ्या अंगाडीया यांच्याकडे त्यांचे काम सुरळीत ठेवण्यासाठी खंडणी मागितल्याप्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात त्याच पोलीस ठाण्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल झाला होऊन गुन्ह्याचा तपास मुंबई गुन्हे शाखेच्या सीआययुकडे सोपविण्यात आला होता. याप्रकरणी सीआययुने तिन्ही अधिकाऱ्यांना अटक केली आहे. सीआययुच्या तपासात तत्कालीन पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांचे नाव या गुन्ह्यात आले असून त्रिपाठी यांनी खंडणीची रक्कम स्वीकारून ती हवाला मार्फत उत्तर प्रदेशात पाठवल्याचे समोर आले. या सर्व प्रकरणानंतर त्रिपाठी यांनी वैद्यकीय रजा टाकली. तेव्हापासून ते गुढरीत्या बेपत्ता झाले आहे. काही दिवसांपूर्वी त्रिपाठी यांनी या गुन्ह्यात अटक होऊ नये म्हणून न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. या जामीन अर्जावर २३ मार्च रोजी सुनावणी होणार आहे.
नोकराला अटक
सौरभ त्रिपाठी यांनी अंगाडीया यांच्याकडून स्वीकारलेली खंडणीची रक्कम हवाला मार्फत उत्तर प्रदेशातील आपल्या नोकराकडे पाठविल्याची माहिती सीआययुला मिळाली असता सीआययुने उत्तर प्रदेशातील लखनौमधील गोमती नगर येथून त्रिपाठी यांचा नोकर पप्पूकुमार गौड याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन अटक केली. पोलिसांनी त्याच्याजवळून खंडणीच्या रकमेपैकी दीड लाख रुपयांची रक्कम हस्तगत केली असल्याची माहिती पोलीस सूत्रानी दिली आहे.
(हेही वाचा – काँग्रेस झालं कमकुवत! सुशील कुमार शिंदेंनीच केलं मान्य)
सूत्रांच्या माहितीनुसार, त्रिपाठी यांनी हवाला मार्फत पाठवलेली खंडणीची रक्कम पप्पूकुमार याने स्वीकारली होती, त्यातील काही रक्कम पोलिसांनी पप्पूकुमार याच्याजवळून हस्तगत करण्यात आली असून उर्वरित रक्कम हस्तगत करणे बाकी आहे. दरम्यान रविवारी पप्पूकुमार याला सुट्टीच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला २८ मार्चपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेचे पथके त्रिपाठी यांच्या मागावर असून त्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community