छत्रपती शिवाजी महाराज यांचा संपूर्ण इतिहास भव्य स्वरूपात नाटकाच्या रूपाने सादर करण्यात येत असलेला ‘जाणता राजा’ या नाटकांचे खास प्रयोग १९ मार्चपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (शिवाजी पार्क) येथे आयोजित करण्यात आले आहेत. गुरुवार, १६ मार्च रोजीच्या प्रयोगासाठी आयोजकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज शिवेंद्रराजे भोसले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आरती लिहिणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे वंशज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांना व्यासपीठावर निमंत्रित केले होते. या दोघांच्या हस्ते शिवरायांची आरती करून प्रयोगाला प्रारंभ करण्यात आला. योगायोग म्हणजे ही आरती गाणाऱ्या प्रसिध्द गायिका उषा मंगेशकर यावेळी उपस्थित होत्या.
तीन तासांच्या नाटकात शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते छत्रपती होण्यापर्यंतचे ऐतिहासिक वैभव पाहायला मिळते. नाटकात भव्यता, दिव्यता आहे. २५० हून अधिक कलाकार, आकर्षक रोषणाई, आकर्षक वेशभूषा, तोफखाना, घोडेस्वार सैनिक आणि मनाचा ठाव घेणारी गाणी यांनी सजलेले हे महानाट्य हजारो मुंबईकरांनी मंत्रमुग्ध करून टाकते. घोडे, बैलगाडी, नेत्रदीपक आतषबाजी आणि नवीन रंगमंचासहित शिवजन्म पूर्व काळ, शिवजन्म, शिवरायांचा न्याय निवाडा, रांझ्याच्या पाटलाला दिलेली शिक्षा, अफझलखान वध, सुरत छापा, शाहिस्तेखान छापा,आग्र्याहून सुटका आणि रोमहर्षक राज्यभिषेक सोहळा अशा अनेक प्रसंगांचे सादरीकरण करण्यात आले आहे. महानाट्यात गीतांचा प्रभावी वापर केला गेला आहे. विविध ऐतिहासिक घटनांचा खुलासाही सविस्तरपणे करण्यात आला. ध्वनिमुद्रित संवाद, गाणी आणि पार्श्वसंगीत यांच्यातील मेळ अचंबित करणारा होता. लक्ष वेधून घेणारे नृत्य आणि लोकगीतांतून स्वराज्याचा इतिहास डोळ्यांसमोर उभा राहिला होता. महानाट्यात पोवाडा, गोंधळ, अभंग याबरोबर लोकगीतांचा वापर खुबीने करण्यात आला.