संस्कार भारती उत्तर मुंबई जिल्ह्याच्या वतीने ‘देश वंदना’ हा कार्यक्रम दिनांक ११ फेब्रुवारी २०२३ रोजी उत्कर्ष मंदिर शाळा मालाड पश्चिम येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात हुतात्मा मेजर कौस्तुभ राणे यांच्या मातोश्री वीरमाता ज्योतिताई प्रकाशकुमार राणे यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ज्योतिताई राणे यांनी हुतात्मा मेजर कौस्तुभ राणे यांच्या आठवणींना उजाळा दिला.
( हेही वाचा : आघाडीतील २० ते २२ आमदार संपर्कात; उदय सामंतांचा गौप्यस्फोट)
ज्येष्ठ लेखक व संस्कार भारती उत्तर मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष डॉ. गिरीष दाबके, भारतीय जनता पक्ष, उत्तर मुंबई व्यापारी सेलचे अध्यक्ष संकल्प शर्मा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचे सह-कार्यवाह तसेच हिंदुस्थान पोस्ट या न्यूज मीडियाचे मुख्य संपादक स्वप्नील सावरकर असे मान्यवर या कार्यक्रमात उपस्थित होते. या प्रसंगी संस्कार भारतीच्या कार्यकर्त्यांनी व निमंत्रित गायकांनी देशभक्तीपर गीते सादर केली तसेच नृत्य देखील सादर केले.
काशी कथक केंद्राच्या कलाकारांनी गणेशवंदना आणि सुभाषचंद्र बोस यांच्यावर नाटिका सादर केली तसेच नृत्यसंस्कार विद्यालयाच्या कलाकारांनी इंद्रजिमी जंभपर आणि जयोस्तुते या गाण्यावर कथक नृत्य सादर केले. रविंद्र देवधर दिग्दर्शित आणि प्रदीप तुंगारे लिखित ‘मी भारतीय’ या द्विपात्री दीर्घांकाचे सादरीकरण करण्यात आले. रविंद्र देवधर आणि ऋषिकेश कानडे या कलाकारांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.
याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ज्येष्ठ पत्रकार स्वप्नील सावरकर म्हणाले की, आपल्या देशाला अशा कार्यक्रमांची नितांत आवश्यकता आहे. संस्कार भारती करत असलेले कार्य अतिशय कौतुकास्पद आहे. कारण मी स्वतः बोलण्यावर नव्हे तर कृतीवर भर देतो. आपल्या सैनिकांमुळे आपण सुरक्षित आहोत. आपले सैनिक सीमेवर ठाण मांडून बसतात. म्हणून एकवेळ ‘पठाण’ विसरलात तरी चालेल पण ‘ठाण’ मांडून बसलेल्या सैनिकांना कधीही विसरु नका.
संस्कार भारतीच्या ‘देश वंदना’ कार्यक्रमात हुतात्मा मेजर कौस्तुभ राणे यांच्या मातोश्रीचा सत्कार
स्वप्नील सावरकर यांनी हुतात्मा मेजर कौस्तुभ राणे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली व वीरमाता म्हणून ज्योतिताई राणे यांचे आभार मानले. या प्रसंगी हुतात्मा मेजर कौस्तुभ राणे यांच्या आठवणींना उजाळा देताना वीरमाता ज्योतिताई राणे भावूक झाल्या आणि जमलेल्या श्रोतृवर्गाच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. ‘आपण सगळे जरी सैन्यात जात नसलो तरी आपण नागरिक देशाचं काम विविध पद्धतीने करु शकतो. लोकांमध्ये देश-भावना जागृत करु शकतो’ असं म्हणत त्यांनी उपस्थित श्रोत्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर अनिल ताटके, पंडित मॅडम आणि भाग्यश्री सावंत यांनी संस्कार भारतीचे ध्येयगीत सादर केले. संस्कार भारतीचे मुंबई विभागाचे अध्यक्ष श्रीकांत मराठे यांनी पाहुण्यांची ओळख करुन दिली. संस्कार भारतीचे उत्तर मुंबई जिल्ह्याचे महामंत्री जयेश मेस्त्री यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना मांडली व पराग वाळिंबे यांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी स्वीकारली. असे कार्यक्रम ठिकठिकाणी व्हायला हवेत अशी भावना श्रोतृवर्गाने व्यक्त केली.
Join Our WhatsApp Community