बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात गुजराहून आणलेल्या सिंहांच्या जोडीला पाहण्यासाठी पर्यटकांना अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरीस सिंह सफारीच्या जागेच्या विस्तारीकरणाचे काम पूर्ण करण्याचे उद्यान प्रशासनाचे उद्दिष्ट होते. पण सफारीच्या विस्तारीकरणाच्या जागेत सिंह सोडण्याअगोदर उंच बंद जाळ्या लावण्याचे काम पूर्ण करण्याचे आव्हान अद्यापही उद्यान प्रशासनासमोर आहे. या जाळ्यांची डिझाईन्स आणि विस्तारीकरणाची जागा निवडण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळ खर्च केल्याने गेल्या आठ वर्षांत सिंह सफारीचे काम रखडले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
२०१५ साली जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सिंह सफारीच्या विस्तारीकरणाचे काम सुरू करण्यात आले. त्याअगोदर सिंह सफारीची जागा १२ हेक्टर होती. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या नियमानुसार जागा आता २० हेक्टरपर्यंत उद्यान प्रशासनाला विस्तारायची होती. विस्तारीकरणासाठी जंगलातील परिसर निवडण्यात पाच वर्षे वाया गेली. सिंह सफारीला लागून असलेल्या घनदाट जंगलातील परिसर निवडण्यात, तसेच डिझाईन्स अंतिम स्वरुपात निश्चित करण्यात उद्यान प्रशासनाचा वेळ आणि पैसे दोन्ही वाया गेले. सार्वजनिक बांधकाम खात्याने अद्यापही या कामाच्या टेंडरींगसाठी तसेच एकूण खर्चाची रक्कम उद्यान प्रशासनाला कळवली नसल्याचा दावा सूत्रांनी केला.
(हेही वाचा – आरेत बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू)
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात गुजरातहून सिंहाची जोडी उद्यानात आणल्याचा प्रचंड गाजावाजा वनविभागाने केला. वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी स्वतः उद्यानाला भेट देत सिंहाच्या जोडीला उद्यानातील पर्यायी पिंजऱ्यात सोडले. यावेळी गुजरातहून अजून एक सिंहाची जोडी लवकरच आणली जाणार असल्याचीही वनविभागाने घोषणा केली. सफारीतील पर्यायी पिंजऱ्यात रमलेल्या अडीच वर्षांच्या नर आणि मादी सिंहीणीचे मिलनही होत असल्याने वनाधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यानच्या काळात पिंजऱ्यांच्या दुरुस्तीकरणामुळे वाघ सफारीही बंद आहे. दरवर्षी सफारीच्या किंमतीत वाढ करुन केवळ पर्यायी पिंजऱ्यात बंद असलेल्या वाघांनाच पर्यटकांना दाखवले जाते. पर्यटकांनी सफारील बंद वाघांचे दर्शन होत असल्याने अनेक तक्रारी उद्यान प्रशासनाला केल्या आहेत. परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वनविभागात एकसंघता नसल्याने पर्यटकांची लूटमार सुरू असल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
Join Our WhatsApp Communityसार्वजनिक बांधकाम विभागाकडून काम वेळेवर पूर्ण व्हायला हवे होते. आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कामाचा पाठपुरावा करत आहोत. लवकरच दोन्ही सफारींचे काम पूर्ण होईल. – रेवती कुलकर्णी, विभागीय वनाधिकारी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान