सातारा जिल्ह्यातील ढाणकल गावातील गावक-यांना आणि वनाधिका-यांना मंगळवारपासून रानगव्याने चांगलेच कामाला लावले. अचानक गावाजवळ आलेल्या उजवीकडील शिंग आणि दोन्ही पाय मोडलेल्या रानगव्याने सर्व गावक-यांचे लक्ष वेधले. या रानगव्याला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करुनही बुधवारी सायंकाळी रानगव्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
( हेही वाचा : मुंबईत सर्दी खोकल्याचे रुग्ण वाढले)
अंदाजे आठ ते दहा वर्षांचा नर रानगवा मंगळवारी दुपारी अचानक जखमी अवस्थेत आढळून आल्याने गावक-यांनी वनाधिका-यांना संपर्क केला. या रानगव्याची माहिती मिळताच चांदोली वनविभागाच्या वनाधिका-यांनी त्याला बेशुध्द करुन तपासणी केली. उजवीकडील समोरचा आणि मागील पाय मोडल्याचे वनाधिका-यांच्या लक्षात आले. शरीरातील दुखणे कमी होण्यासाठी आवश्यक औषधे दिल्यानंतर रानगव्याला स्थानिक पातळीवरच उपचार देण्याचे ठरले. रानगवा वयस्कर असल्याने त्याला उचलून उपचार केंद्रात पोहोचवणे कठीण होते म्हणून तातडीने त्याच्यावर जागीच उपचार करण्यास सुरुवात केल्याची माहिती हेल्वाकचे वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप जोपळे यांनी दिली.
संपूर्ण गावात हळहळ
शुद्धीवर आल्यानंतरही भेदरलेल्या रानगव्याने कोणत्याही मनुष्याला त्याच्याजवळ येऊ दिले नाही. रात्रभर वनाधिका-यांनी त्याच्यावर पहारा ठेवला. स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी धडपडणा-या रानगव्याला वनाधिका-यांनी चारा पाणी देऊ केले. पुन्हा बेशुद्ध करण्यात त्याचा जीव जाण्याची भीती होती म्हणून त्याला खाणे-पिणे तसेच औषधोपचार देणे वनाधिका-यांनी सुरु ठेवले. परंतु बुधवारी सायंकाळी रानगव्याने प्राण सोडल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात आली.
Join Our WhatsApp Communityपशुवैद्यकीय अहवालात रानगव्याचा शरीरात अतिरक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. दुस-या रानगव्यासोबत प्रादेशिक वादात किंवा वाहनाच्या धडकेत रानगव्याचा पाय मोडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
– संदीप जोपळे, वनपरिक्षेत्र अधिकारी, हेल्वाक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प