यंदाच्या आठवड्यापासून मुंबईत अतिवृष्टीचा इशारा देणा-या मुंबई प्रादेशिक हवामान खात्याचे सलग चौथ्या दिवशीही हसे झाले. सुरुवातीला ऑरेंज आणि बुधवारपासून यलो अलर्ट देऊनही मुंबईत वरुणराजाचे आगमन झाले नाही. तरीही रविवारपर्यंत पावसासाठी मुंबईत यलो अलर्ट मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने कायम ठेवला आहे.
पावसाच्या गैरहजेरीमुळे वेधशाळेचा गोंधळ…
आठवड्याच्या सुरुवातीला अतिवृष्टीसाठी मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला होता. मात्र पावसाची अपेक्षित कामगिरी न झाल्याने अखेर मंगळवारी मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने आठवड्याभरासाठी अतिवृष्टीसाठी यलो अलर्ट जारी केला. बुधवारी सांताक्रूझ येथे केवळ ५.२ मिमी पावसाची नोंद झाली परिणामी, कमाल तापमानात वाढ होत ३२.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. पावसाची गैरहजेरी लक्षात येताच गुरुवारी दुपारी मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने एक वाजता मुंबईत मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट राहील, असे जाहीर केले. परंतु दुपारी पुन्हा तापमानवाढीचा अनुभव येत मुंबईकरांचा दिनक्रम सुरु राहीला. आठवडाभर छत्री घेऊनही पाऊस कुठे, असा प्रश्न प्रत्येकाच्या चेह-यावर उमटत होता. परिणामी, सांताक्रूझ येथे ३१.२ तर कुलाब्यात ३२.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. किमान तापमानही दोन्ही ठिकाणी अनुक्रमे २६.४ आणि २५.४ अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले.
गुरुवारी मुंबई मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस राहील, शुक्रवारी आणि शनिवारी अतिवृष्टी होईल, असा यलो अलर्ट मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने जाहीर केला आहे.
Join Our WhatsApp Community