‘कोरोना’त पालिकेच्या विकास कामांना गती; ६ महिन्यात ८० ते ९० टक्के निधी खर्च

मुंबईत कोविडमुळे अनेक विकास कामांना खिळ बसल्याची भीती वर्तवली जात असली तरी महापालिकेच्या अनेक पायाभूत सेवा सुविधांची कामे जलदगतीने करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे रस्ते, पावसाळी गटारे व नाल्यांची कामे तसेच पुलांची कामांसाठी तरतूद केलेला निधीच सहा ते सात महिन्यांमध्ये जवळपास संपला गेला आहे. त्यामुळे रस्ते व वाहतूक खाते, पूल खाते आणि पर्जन्य जलवाहिनी खात्यांसाठी प्रत्येकी २०० कोटी याप्रमाणे एकूण ६०० कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची गरज भासू लागली आहे. त्यामुळे या खात्यांच्या विविध प्रकल्पांसाठी केलेल्या निधीच्या तरतुदीतून सुमारे ६०० कोटींचा निधी हस्तांतरीत करण्यास येत आहे.

जाणून घ्या किती झाला खर्च

महापालिकेच्या सन २०२१-२२च्या अर्थसंकल्पामध्ये प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक खाते), प्रमुख अभियंता (पूल) आणि प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिनी) या विभागांसाठीच्या विविध प्रकल्पकामांसाठी तरतूद केलेल्या निधीतून कामे करण्यात येतात. त्याअंतर्गत विविध रस्त्यांचे रुंदीकरण आणि सुधारणा तसेच ३० फुटांपर्यंत रुंद असलेल्या रस्त्यांच्या सुधारणा, सिमेंट काँक्रीटीकरण आदी कामा रस्ते व वाहतूक खात्यांमध्ये केलेल्या ११७८.१४ कोटी रुपयांच्या तरतुदींपैंकी ११५२.७६ कोटी रुपये २६ ऑक्टोबर २०२१ रोजी खर्च झाला आहे. त्यामुळे २५.३८ कोटी रुपये यासाठी शिल्लक आहे. त्यामुळे प्रशासनाने या खात्यातील अन्य प्रकल्प कामांसाठी केलेल्या तरतुदीतून २०० कोटी रुपयांची अतिरिक्त निधीची मागणी करत वळवण्याचा निर्णय घेतला आहे.

(हेही वाचा – ‘एसटी’नंतर ‘बेस्ट’च्या विलिनीकरणाची मागणी; ‘बेस्ट’ची चाकंही थांबणार?)

प्रशासनाकडून अतिरिक्त निधीची मागणी

तर पूल खात्यांसाठी ४४४.९३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैंकी ३७०.३३ कोटी रुपयांचा खर्च तिन्ही विभागांमध्ये नाल्यांवरील पूल, रेल्वे पूल, पादचारी पूल तसेच भुयारी मार्ग व त्यासाठी सरकते जिने, नवीन बांधकाम, पुनर्बांधणी तसेच दुरुस्तीच्या कामांसाठी खर्च झाली आहे. त्यामुळे या या कामांसाठी ७४.६० कोटींचा निधी केवळ शिल्लक असून प्रशासनाने या विभागातील २०० कोटींच्या अतिरिक्त निधीची मागणी करत वळवण्याचा निर्णय घेतला आहे.

स्थायी समितीच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर

तर पर्जन्य जलवाहिनी विभागातील नाले वळवणे, नाल्याचे रुंदीकरण करणे, खोलीकरण, नाल्यांची पुनर्बांधणी, नाल्यांचे संरक्षक भिंत आदी कामांसाठी ५०५.१४ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली होती. यापैंकी ४८७.३६ कोटी रुपये ऑक्टोबरपर्यंत खर्च झाले असून केवळ १७.७८ कोटी रुपयांचा निधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे शिल्लक रकमेतून पुढील कामे पार पाडणे शक्य नसल्याने अन्य कामांसाठी केलेल्या तरतुदीतून २०० कोटी रुपयांचा निधी या कामांसाठी वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या तिन्ही खात्यांसाठी ६०० कोटी रुपयांचा निधी वळवण्यात येणार असून स्थायी समितीच्या मान्यतेसाठी हे प्रस्ताव सादर करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here