तत्व हाच प्राण आणि विचारांशी इमान हे बाळासाहेबांच्या राजकारणाचं मुख्य सूत्र होते, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी त्यांना आदरांजली वाहिली. देवेंद्र फडणवीस यांनीही बाळासाहेब ठाकरेंविषयी एक खास व्हिडीओ पोस्ट करत त्यांना आदरांजली वाहिली आहे.
(हेही वाचा-India in Final : इंडिगो विमानाच्या वैमानिकाने जेव्हा विमानातच दिले उपान्त्य सामन्यांचे अपडेट, व्हीडिओ व्हायरल )
फडणवीस म्हणतात, हिंदूहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नामक ज्वलंत हिंदुत्वाचा धगधगता निखारा १७ नोव्हेंबर २०१२ या दिवशी शांत झाला. आज बाळासाहेबांची पुण्यतिथी. त्यांना वैकुंठवासी होऊन एक दशक उलटले असूनही त्यांचे विचार अजूनही लोकांच्या मनात जिवंत आहेत. मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी झगडणाऱ्या बाळासाहेबांनी कायमच प्रखर हिंदुत्व आणि अखंड हिंदुस्थानाचे हात बळकट करण्यासाठी कष्ट उपसले.
तत्व हाच प्राण आणि विचारांशी इमान हे बाळासाहेबांच्या राजकारणाचं मुख्य सूत्र होतं. राज्याच्या भल्यासाठी कठोर भूमिका घेणारे आणि वेळप्रसंगी फुलाप्रमाणे कोमल असणारे बाळासाहेब हे एक अजब रसायन होतं. आपल्या ठाकरी शैलीने भल्याभल्यांच्या ठिकऱ्या उडवून टाकणाऱ्या बाळासाहेबांनी उभ्या आयुष्यात कुणावरही व्यक्तीगत आकस बाळगला नाही. सर्जनशील व्यंगचित्रकार, अमोघ वक्तृत्व आणि तत्वनिष्ठ राजकारणी हिंदूहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना कोटी कोटी वंदन.’ हा उल्लेख असलेला व्हिडीओ देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट केला आहे.
Join Our WhatsApp Community