मध्यप्रदेशातील भोपालनजीकच्या सिहोरच्या कुबेश्वर धाम येथे आयोजित रुद्राक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पंडीत प्रदीप मिश्रा यांनी हा महोत्सव आयोजित केला आहे. महोत्सवात रुद्राक्ष मिळवण्यासाठी देशभरातून लाखोंची गर्दी झाली आहे. या महोत्सवात महाराष्ट्रातूनही हजारो लोक गेले आहेत. यावेळी मोफत रुद्राक्ष घेण्यासाठी झालेल्या गर्दीमुळे गोंधळ उडाल्याची घटना घडली या गोंधळात बुलढाण्यात खामगाव तालुक्यातील तीन महिला बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. या महिलांशी संपर्क होत नसल्याने त्यांच्या नातेवाईकांनी खामगाव पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
अकोल्यातील 4 महिला बेपत्ता
अकोला जिल्ह्यातील चार महिला सध्या बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे. यात पातूर तालुक्यातील सस्ती गावातील दोन महिला तर अकोला शहरातील शिवसेना वसाहत भागातील दोन महिला बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. शिवहोर येथे तर वाहनांच्या 20 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याची माहिती आहे. याच महोत्सवात गर्दीमुळे प्रचंड गोंधळ उडाला आहे. यात अनेक जिल्ह्यातील लोक सध्या बेपत्ता असल्याने कुटुंबिय चिंतेत आहेत.
( हेही वाचा: Income Tax Raid: आयकर विभाग छापे टाकतो म्हणजे नेमके काय करतो? जाणून घ्या सविस्तर )
मागच्या वर्षीही भाविकांनी केली होती गर्दी
मागच्या वर्षी देखील मार्च महिन्यात सिहोर येथे रुद्राक्ष वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आठ दिवसांत 15 लाख भाविक येतील अशी अपेक्षा असताना, पहिल्याच दिवशी पाच लाख भाविक पोहोचले आणि गोंधळ उडाला. महामार्ग ठप्प झाले. भाविकांचे हाल होऊ लागले. प्रशासन आणि आयोजकांनी केलेले सर्व नियोजन कोलमडले. नाईलाजाने कथा मध्येच सोडून रुद्राक्ष वाटप स्थगित करत असल्याचे पंडित प्रदीप मिश्रा यांनी जाहीर केले होते. सलग दुस-या वर्षी सोशल मीडियावर प्रदीप मिश्रा यांचा चांगला प्रचार झाला. परिणामी, यावर्षी गेल्या वर्षीपेक्षा अधिक गर्दी वाढली आणि गोंधळ उडाला.