राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश राज्यातील सर्व पोलिसांना देण्यात आले असल्याची माहिती राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. राज्यात ८७ राज्य राखीव दलाच्या तुकड्या आणि ३० हजार होमगार्ड तैनात करण्यात आले असून १५ हजार जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सेठ यांनी दिली.
भोंग्याच्या वादातून राज्यात दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत सरकारला दिलेल्या अल्टीमेटमवर सरकारच्या हालचालीला वेग आला आहे. मंगळवारी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्याचे पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त यांची बैठक पोलीस महासंचालक कार्यालयात पार पडली. या बैठकीत पोलिसांना कारवाईचे आदेश देण्यात आले आहे.
कलम १४९ च्या नोटीसा बजावण्यात आल्या
दरम्यान दुपारी १ वाजता पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांची भूमिका स्पष्ट केली आहे. राज्यात जातीय तेढ निर्माण करणाऱ्याचा प्रयत्न कारणा-यावर कडक कारवाई करण्याचे आदेश राज्यातील सर्व पोलिसांना देण्यात आले असल्याची माहिती रजनीश सेठ यांनी दिली आहे. महाराष्ट्र पोलीस दल, कायदा व सुव्यवस्था हाताळण्यास सक्षम असून तसे राज्यातील सर्व पोलिसांना आदेश देण्यात आले असल्याचे रजनीश सेठ यांनी म्हटले आहे, १५ हजारापेक्षा अधिक समाजकंटक आणि गुन्हेगारांना प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून अनेकांना कलम १४९ च्या नोटीसा बजावण्यात आलेल्या असल्याचे सेठ म्हणाले. राज्यात ८७ राज्य राखीव पोलीस दलाच्या कंपन्या तसेच ३० हजार होमगार्ड राज्यात तैनात करण्यात आलेले असल्याची माहिती पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी दिली. जनतेने शांतता राखून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी केले आहे.
राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल…
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे केलेल्या चिथावणीखोर भाषणानंतर औरंगाबाद पोलिसांनी संपूर्ण भाषण एकूण त्याच्यावर ५ तास अभ्यास करून त्याचा अहवाल गृहमंत्री यांना पाठविण्यात आलेला आहे. गृहमंत्री यांनी सकाळी राज्याचे पोलीस महासंचालक आणि इतर जेष्ठ पोलीस अधिकारी यांच्यासोबत बैठक पार पडली, या बैठकीत गृहमंत्री यांनी पोलिसांना कारवाईचे आदेश दिले आहे. या आदेशानंतर औरंगाबाद पोलीस आयुक्त यांच्याकडून राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची तयारी करण्यात आलेली असून सायंकाळ पर्यत त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गुन्हा दाखल करण्याचे सर्व अधिकार औरंगाबाद पोलीस आयुक्त यांना देण्यात आलेले असून ते त्याच्यावर निर्णय घेतील असे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
Join Our WhatsApp Community