दिनेशनंदिनी दालमिया (Dineshandini Dalmia) यांचा जन्म १६ फेब्रुवारी १९२८ साली राजस्थानमधील उदयपूर येथे झाला. त्या एक भारतीय कवयित्री आणि लेखिका होत्या. त्यांनी अनेक कविता, लघुकथा आणि कादंबऱ्या लिहिल्या आहेत. दालमिया ग्रुपचे संस्थापक रामकृष्ण दालमिया यांच्या त्या पाचव्या पत्नी होत्या. त्यांच्या विवाहाच्या वेळी रामकृष्ण दालमिया यांच्या आधीच्या चार पत्नींपैकी तीन जणी हयात होत्या. त्यावेळी त्यांनी लिंगभेदाचा विरोध केला, डोक्यावरून पूर्ण पदर घेण्याच्याही त्या विरोधात होत्या. आपल्या लेखनातूनही दिनेशनंदिनी दालमिया यांनी स्त्रीमुक्ती, लिंगभेद आणि रुढीवाद यांना कठोरपणे विरोध केला. शबनम, निराश आशा, मुझे माफ करना आणि ये भी झूठ है ही त्यांची काही उल्लेखनीय पुस्तकं आहेत.
२००१ साली दिनेशनंदिनी यांना हिंदी साहित्य अकादमीचा, महिला सशक्तीकरण हा पुरस्कार देण्यात आला . तर २००५ साली राणी दुर्गावती विद्यापठाकडून त्यांना डॉक्टरेट ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आले होते. २००६ साली दिनेशनंदिनी दालमिया यांना भारतीय साहित्यातील त्यांच्या योगदानासाठी भारत सरकारने ‘पद्मभूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. त्यानंतर भारतीय पोस्ट खात्याने त्यांच्या स्मरणार्थ २००९ साली एक स्टॅम्प जाहीर केला होता. याव्यतिरिक्त त्यांना प्रेमचंद पुरस्कार देखील देण्यात आला होता.
(हेही वाचा-Vasai Accident : वसईच्या बाभोला परिसरात मोटरसायकल-कारची भीषण धडक)
दिनेशनंदिनी दालमिया (Dineshandini Dalmia) यांनी वयाच्या तेराव्या वर्षापासूनच गद्य कविता लिहायला सुरुवात केली होती. त्यांना शिक्षणाचीही आवड होती. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांचे लग्न रामकृष्ण दालमिया यांच्याशी झाले. लग्नानंतर त्यांनी पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केले. पदव्युत्तर पदवी मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. दिनेशनंदिनी दालमिया या आधीपासूनच स्त्रीवादी विचारांच्या होत्या.
एवढेच नाही तर दिनेशनंदिनी दालमिया (Dineshandini Dalmia) या ‘इंडो-चायना फ्रेंडशिप सोसायटी’, लेखिका संघ आणि आयसीआरएल च्या सदस्या होत्या. तसेच त्या आयसीआरएल च्या अध्यक्षाही होत्या. दिनेशनंदिनी यांच्या जीवनावर आधारित ‘फुल का दर्द’ नावाची एक डॉक्युमेंटरी फिल्मही प्रदर्शित झालेली आहे. दिनेशनंदिनी यांचे निधन २५ ऑक्टोबर २००७ साली दिल्ली येथील त्यांच्या राहत्या घरात झाले. त्यांच्या मुलीचे नाव नीलिमा दालमिया अधर असून ती सुद्धा एक प्रसिद्ध लेखिका आहे. दिल्ली सरकारने दिनेशनंदिनी दालमिया यांच्या स्मरणार्थ डब्ल्यू पॉईंट टिळक मार्ग इथल्या बाजाराला दिनेशनंदिनी दालमिया चौक असे नाव दिले आहे. तसेच भारतीय पोस्ट खात्याने त्यांच्या नावाचे आणि चित्राचे स्टॅंप जाहीर केले होते.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community