वरोराजवळ आढळलं डायनासोरसदृश्य जीवाश्म

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात डायनासोरच्या आकाराच्या प्राण्याच्या हाडांचा सांगाडा सापडला आहे. हा सांगाडा डायनासोरसदृश्य असला तरीही हत्तीचाही असू शकतो, अशी शक्यता भूगर्भशास्त्रज्ञ व पर्यावरण अभ्यासक सुरेश चोपणे यांनी व्यक्त केली आहे.

वर्धा नदीच्या पात्रात आढळला सांगाडा

चार फूट लांब आणि एक फुटाच्या आसपास पायाचं हाड, तीन फूट लांब बरगडी वरोरा तालुक्याच्या तुळाना गावाजवळील वर्धा नदीच्या पात्रात आढळलं. या भागांतील शेतकरी विजय ठेंगणे आणि त्यांच्या मुलांना सुरुवातीला हा खडक असावा असं वाटलं. खडकाबाबतची माहिती मिळताच चंद्रपूर येथील भूगर्भशास्त्रज्ञ व पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी घटनास्थळाला भेट दिली.

हाडाच्या आकारावरुन प्राणी १५ फूट उंचीचा असावा. या प्राण्याच्या शरीराची लांबीही अंदाजे २० फुटांची पसरट असावी. यावरुन हा जीव डायनासोर किंवा हत्ती असावा. याबाबत भूगर्भशास्त्र विभागाला कळवण्यात आलं असून प्रयोगशाळेतील तपासणीनंतरच खात्रीलायक माहिती मिळेल.
– प्रा. सुरेश चोपणे, भूगर्भशास्त्रज्ञ आणि पर्यावरण अभ्यासक

वरोरा तालुक्यात रेती उत्खननाचं काम सुरु आहे. त्यामुळे उत्खननाच्या कामात जमिनीतील पुरली गेलेली जीवाश्म किंवा ठिकठिकाणी गाडले गेलेल्या प्राण्यांची हाडं नदीच्या पात्रात फेकली गेल्याचाही अंदाज व्यक्त होतो आहे. अलीकडेच नदीच्या पात्रात हत्तीचे दातही सापडले होते, आता सापडलेली हाडं नाजूक आणि कच्ची असल्यानं ती १५-२० वर्ष जुनी असावीत, असाही अंदाज व्यक्त होत आहे. स्थानिकांना नदीच्या पात्रात काही वेगळे खडक दिसून आल्यास त्यांनी भूगर्भशास्त्र विभागाला माहिती द्यावी, असं आवाहन करण्यात येतंय.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here